रावेर कापूस खरेदी केंद्रात महिनाभरात केवळ तीन दिवसच खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 05:22 PM2020-01-13T17:22:21+5:302020-01-13T17:24:10+5:30
शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित ज्वारी व मका खरेदी केंद्राचे नुसते काटापूजनावर बस्तान गुंडाळल्यानंतर आता कापूस खरेदी केंद्रात महिनाभरातील तीन आठवड्यात तीन दिवस येवून ग्रेडरच्या मनमानीने केवळ दोन हजार २०० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित ज्वारी व मका खरेदी केंद्राचे नुसते काटापूजनावर बस्तान गुंडाळल्यानंतर आता कापूस खरेदी केंद्रात महिनाभरातील तीन आठवड्यात तीन दिवस येवून ग्रेडरच्या मनमानीने केवळ दोन हजार २०० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ग्रेडर गणेश कराडे यांची बोदवड कापूस खरेदी केंद्रात मूळ नियुक्ती आहे. रावेर तालुक्यातील २७७ कापूस उत्पादकांना प्रतीक्षा यादीत ताटकळत ठेवून अन्याय केल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांंमधून व्यक्त होत आहे.
रावेर तालुक्यातील खरिपाच्या ज्वारी व मका पिकाचे अवकाळी भीज पावसाने धुळघाण करून बारा वाजवले होते. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावून आस्मानी संकट आणले. मात्र त्यापेक्षा संकटात शेतकºयांसाठी मायबाप असणाºया शेतकºयांना पोटावर मारले. केवळ पूर्व मशागत वा बी बियाण्यांच्या खर्चाचीही तोंडमिळवणी होणार नाही, अशी हेक्टरी आठ हजारांची तुटपुंजी मदत देवून शासनाने शेतकºयांची टिंगल केली. नव्हे तर शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत एफएक्यू दर्जाच्या ज्वारी व मका खरेदी केंद्राचे केवळ नाममात्र फोटोसेशनकरीता काटापूजन करून खरेदी केंद्राची मुदत संपुष्टात येईपावेतो एक दाणाही खरेदी न करता ज्वारी व मका खरेदी केंद्र बासनात गुंडाळल्याची दुर्दैवी शोकांतिका आहे.
दरम्यान, शासनाच्या कापूस खरेदी केंद्राचे गत एक महिनाभरापूर्वी मे बबनलाल भिकूलाल अग्रवाल जिनींग व प्रेसिंग कंपनीत आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते काटापूजन करून शुभारंभ करण्यात आला होता. दरम्यान, या केंद्रासाठी बोदवड कापूस खरेदी केंद्रातील ग्रेडर गणेश कराडे यांची अतिरिक्त कार्यभार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
संबंधित ग्रेडर आठवड्यात तीन दिवस बोदवड तालुक्यात तर तीन दिवस रावेर तालुक्यात देतील, अशी सर्वंकष भावना शेतकºयांच्या मनात होती. मात्र, संबंधित ग्रेडरनी शेतकºयांचा पूर्णत: भ्रमनिरास केला आहे. ग्रेडरनी बोदवड कापूस खरेदी केंद्राला झुकते माप दिले असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. गत महिनाभरात त्यांनी केवळ तीन आठवड्यातील तीन दिवस येवून केवळ दोन हजार २०० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. त्या ३७७ क्विंटल प्रतिदिन खरेदीनुसार महिनाभरात २२ हजार क्विंटल कापूस खरेदी होणे गरजेचे होते. तथापि, निम्मे कार्यकाळ गृहित धरला तरी किमान ११ हजार क्विंटल कापूस खरेदी होणे गरजेचे होते. मात्र केवळ २ हजार २०० क्विंटल कापूस खरेदी झाल्याने किमान नऊ हजार क्विंटल तर कमाल २० हजार क्विंटल कापूस खरेदी होऊ न शकल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
आमदार चौधरी यांनी कापूस खरेदी उद्घाटनप्रसंगी कायमस्वरूपी ग्रेडर नियुक्ती करण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वस्त केले होते. मात्र, अद्यापपावेतो कायमस्वरूपी ग्रेडर नियुक्त होण्याबाबत शासन स्तरावरून उदासीनता दिसत आहे. रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात आजपावेतो २७७ शेतकरी प्रतीक्षा यादीत ताटकळत असल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकºयांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
रावेर बाजार समिती व महसूलची उदासीनता?
कापूस खरेदी केंद्रातील ग्रेडर नियमित येत नसल्याने नियमित ग्रेडरची नियुक्ती करण्यासंबंधी रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती व महसूल विभागाकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यासंबंधी उदासीनता दिसून आल्याने आजपावेतो नियमित ग्रेडरची नियुक्ती होऊ न शकल्याची शोकांतिका आहे.
रावेर कापूस खरेदी केंद्रात ग्रेडर गणेश कराडे यांनी महिनाभरात तीन दिवस येवून आजपावेतो दोन हजार दोनशे क्विंटल कापूस खरेदी केला आहे. २६ डिसेंबरपर्यंतचे चुकारे शेतकºयांना अदा केले आहेत. तत्संबंधी कापूस खरेदीत सातत्य राखण्याची गरज असून पाठपुरावा सुरू आहे.
-गोपाळ महाजन, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रावेर
बोदवड-मुक्ताईनगर तालुक्यांसह भुसावळ तालुक्यातील निम्मे कापूस उत्पादनाचे क्षेत्र बोदवड कापूस खरेदी केंद्रावर अवलंबून आहे. चार हजार कापूस उत्पादक शेतकरी बोदवड कापूस खरेदी केंद्राच्या प्रतीक्षा यादीत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून इकडील तहसीलदार व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडून सातत्याने तगादा आहे. रावेर कापूस खरेदी केंद्राच्या तुलनेत जादा भार असल्याने तुलनात्मक दृष्टीने बोदवड कापूस खरेदी केंद्राला प्राधान्य द्यावे लागत आहे. तरीही रावेर कापूस खरेदीसाठी दोन तीन दिवसांत येवून कापूस खरेदी केंद्रातील खरेदी करणार आहे.
-गणेश कराडे, ग्रेडर, कापूस खरेदी केंद्र, रावेर