जळगाव: बेकायदेशीर वाळू वाहतूक, दंगलीमधील सहभाग, लोकांमध्ये दहशत माजविणे यासह इतर गंभीर गुन्ह्यातील सहभागाची गंभीर दखल घेत जळगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी जळगाव शहर आणि नशिरबादमधील प्रत्येकी एका व्यक्तीला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सोमवारी, हे आदेश बजाविण्यात आले. दोघांना दोन दिवसात जळगाव सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे.
अपर पोलिस अधीक्षक, नशिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून प्रांताधिकारी महेश सुधळकर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केले होते. त्यावर नुकतीच सुनावणी पूर्ण झाली.
फैजलखान अस्लमखान पठाण (वय २२, आझाद नगर, पिंप्राळा) याच्या विरोधात जळगाव तालुका, धरणगाव व जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर वाळू वाहतुकीत त्याचा सहभाग आढळून आला होता, तर शेख शोएब शेख गुलाम नबी (वय २७, ख्वाजा नगर, नशिराबाद) याच्या विरोधात नशिराबाद पोलिसात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या दोघांना प्रत्येकी दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करावे, असा प्रस्ताव पोलिसांनी दिला होता. प्रांताधिकाऱ्यांनी प्रस्तावावर सुनावणीअंती ७ ऑगस्ट रोजी, हद्दपारीचे आदेश बजावले आहेत. दोघांना दोन दिवसात जळगाव सोडून जाण्याचे आदेशात म्हटले आहे.