३०जणांना देणार ऑक्सिजन प्लांटचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:33 AM2021-09-02T04:33:08+5:302021-09-02T04:33:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुख्यमंत्री कौशल्यविकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ६०० जणांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्यासह विविध ३६ प्रकारचे प्रशिक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुख्यमंत्री कौशल्यविकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ६०० जणांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्यासह विविध ३६ प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणारा जळगाव जिल्हा पहिला जिल्हा ठरला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत कुशल मनुष्यबळाचा मुद्दा निकाली निघणार आहे. त्यातच ३० जणांना स्वतंत्र ऑक्सिजन प्लांटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
कोविड काळात कुशल मनुष्यबळाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यंत्र सामुग्री होती. मात्र, ती हाताळायला योग्य मनुष्यबळ नसल्याने आरोग्य यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर कोविडमधील मनुष्यबळाचा मुद्दा बघता ८ जुलैपासून मुख्यमंत्री कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ६०० जणांना यात प्रशिक्षण देण्यात आले. यात तांत्रिक मशिनरी हाताळणे, जनरल ड्युटी, तत्काळ वैद्यकीय सेवा आदींचा समावेश होता. हे प्रशिक्षण ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आले. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होणार असून, त्यातच कुशल मनुष्यबळ यंत्रणेला मिळणार आहे.
ऑक्सिजन प्लांटसाठी नियोजन
जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे १५ प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी कुशल मनुष्यबळ लागणार असून, आगामी तिसऱ्या लाटेची शक्यता बघता ३० जणांना याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रत्येक ठिकाणी किमान दोन जणांची नियुक्ती केल्यानंतर या प्रकल्पांची हाताळणी योग्य प्रकारे होणार आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.