लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केवळ नावालाच उभा असलेल्या ऑक्सिजन टँक आता पुढील आठवड्यात कार्यान्वित होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पेसो समितीकडून येत्या दोन दिवसात परवाना मिळाल्यानंतर यात लिक्विड भरून आठवडाभरात याद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थिती सी- टू, सी - ३ या कक्षांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यासह आपात्कालीन विभागात कोरोना संशयित तसेच जुन्या अतिदक्षता विभागात चौदा पेक्षा अधिक रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असून दिवसाला साधारण तीनशे सिलिंडर इतके ऑक्सिजन लागत आहेत. रुग्ण वाढल्यास ही संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऑक्सिजनची वाढीव मागणी लक्षात घेता हे ऑक्सिजन टँक उभारण्यात आले होते. मात्र, पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटना अर्थात पेसोकडून अद्यापही या टँकला सुरू करण्याबाबत परवाना मिळालेला नाही.
पाठपुरावा सुरूच
स्थानिक पातळीवर दर महिन्याला याबाबत नियमीत पाठपुरावा केला जात असल्याचे शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. बुधवारीच पेसोच्या संबधित यंत्रणेशी डॉक्टरांचे बोलणे झाले असून आता येत्या दोन दिवसात परवाना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्ण परवाना आल्यानंतर येत्या आठवडाभरात हे टँक कार्यान्वित होणार आहे.
टँकची क्षमता
२० केएल : साधारण २१०० ते २४०० जम्बो सिलिंडर
सद्या आवश्यकता : ३०० जम्बो सिलिंडर प्रतिदिवस