कुंदन पाटील/जळगाव
जळगाव : यंदा पपई उत्पादकांच्या पदरी निराशा आली आहे. ऐन हिवाळ्यात प्रत्येक पपईमागे उत्पादकाच्या हातात एक रुपया पडत असल्याने अनेकांनी हातात शेतात नांगर फिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवार व्यापणाऱ्या ‘पपई’नेच यंदाच्या हंगामात शेत खाऊन टाकल्याचे चित्र जिल्हाभर दिसून येत आहे.
यंदा सिंचनासाठी पाणी नाही. तशातच जिल्ह्यातील उत्पादकांनी तैवानीसह विविध जातींच्या पपईची लागवड केली. मोठी कसरत करीत पपईच्या झाडांचे जतन केले. हिवाळा सुरु झाल्यावर पपईची आवक सुरु झाली. सुरुवातीला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना समाधान वाटत गेले.
नंतर मात्र पपईची आवक प्रचंड वाढली.त्यामुळे पपईच्या तोडणीसह तिला बाजारात नेण्याचा खर्चाचे गणित उत्पादकांना अडचणीत आणत गेले. बाजार समित्यांच्या लिलावात ४ ते ५ रुपये नगाने पपईची विक्री होत गेली. तेव्हा तोडणीसह अन्य खर्च काढल्यावर उत्पादकांच्या हातात केवळ रुपया पडत गेला. त्यामुळे पपईची तोडणी रोखली. झाडावर पिकत पिकलेल्या पपई गळायला लागल्या. शेवटी वैतागलेल्या उत्पादकांनी आता पपईच्या झाडांवर नांगर फिरवायला सुरुवात केली आहे.