लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : दोघांनी घरातून पलायन करीत सुरत गाठले. दोघेही सज्ञान असल्याने येथेच विवाह उरकला. महिन्याभराने चाळीसगावी आल्यानंतर मुलीला घेऊन जाण्यास आलेल्या पालकांसोबत तिने येण्यास स्पष्ट नकार दिला. गुरुवारी शहर पोलीस स्थानकात पोलिसांनींही पालकांसमोर मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती ठाम राहिली. हतबल झालेल्या पालकांना शेवटी परत फिरावे लागले.
शहरातील एका उच्चभ्रू कुटुंबातील प्रेरणा हिचे प्रतीक (दोघांचीही नाव बदलेले आहे.) याच्यासोबत सूत जुळले. प्रेरणा काॕॅलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकते तर प्रतीक शहरातच छोटी-मोठी कामे करतो. दोघांचे प्रेम फुलू लागल्याने भेटीगाठी होऊ लागल्या. यातूनच त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. घरातून विरोध होईल, म्हणून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
टेलरकडे जाते म्हणून निघाली
दि. ८ जानेवारी रोजी प्रेरणाने घरात टेलरकडे जाऊन येते, असे सांगून प्रतीकसोबत सुरतची वाट धरली. मुलगी घरी परतली नाही, म्हणून आई-वडिलांनी हरविल्याची तक्रार नोंदवली. दि. २२ जानेवारी रोजी प्रेरणा आणि प्रतीक घरी आले ते विवाह करूनच. प्रेरणाच्या आई-वडिलांनी तिच्या प्रियकराचे घर गाठले. त्यांनी तिला समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तथापि प्रेरणा आपल्या प्रेमावर ठाम राहिली. तिने आई-वडिलांना परत पाठविले.
आई-वडिलांसोबत बोलण्यासही नकार
प्रकरण पोलिसात पोहचल्यानंतर गुरुवारी सकाळी ११.३० वाजता पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी प्रेरणासह तिच्या आईवडिलांना बोलावले. यावेळी प्रतीकचे आईवडीलदेखील उपस्थित होते. पोलिसांनी प्रेरणाचे म्हणणे जाणून घेतले. ‘मी स्वखुशीने प्रतीकसोबत गेली....माझ्यावर कुणाचा दबाव नाही...उलट आईवडील सासरी येऊन शिवीगाळ करतात...’, असे स्पष्ट सांगत आईवडिलांसोबत बोलण्यासही नकार दिला. मुलीच्या प्रेमापुढे हतबल झालेल्या पालकांना भरल्या डोळ्यांनी माघारी फिरावे लागले.