संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील अर्णव अनिल वाणी... जन्मताच तो दिव्यांगा पलिकडचा आहे. तरीदेखील तो इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत भडगाव तालुक्यात पाचवा आलाय. यासाठी मात्र त्याची माता शीतलने आ... आईचा... आ...ही अक्षरओळख. मुलासाठी नानाविध खस्ता खात. मातृत्वाच्या कसोटीला खरे उतरत जगाला करुन दिलीय.खेडगाव विद्यालयातील २० विद्यार्थ्यांमध्ये फक्त एकटा अर्णव शिष्यवृती परीक्षेत गुणवत्ता यादीत आला. पाचव्या इयत्तेत तो वर्गातून दुसरा आला. केवळ शारीरिक शिक्षणात भाग घेऊ शकत नाही या कारणास्तव पहिला क्रमांक हुकला. आता यात काय विशेष? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. धडधाकट विद्यार्थ्यांचे ठिक आहे पण जो हात असून अन्नाचा घास स्वत: घेऊ शकत नाही. जो पाय असून पुढे पाऊल टाकू शकत नाही. जो एक इंचभरही जागचा हलू शकत नाही. त्याच्या हाती मात्र पेन चमत्कार घडवतोय. अर्णवचा समानार्थी शब्द म्हणजे महासागर... ही कहाणी आहे वेदनांच्या अथांग महासागराला येऊ घातलेल्या गुणवत्ता, प्रावीण्यरुपी भरतीच्या लाटांची. वरदहस्त लाभलेल्या सरस्वतीच्या खळखळाटाची अन् काळीजही कुरतडवून सोडणाऱ्या एका मातेच्या धडपडीची...आजन्म वेदनांचा जन्मअनिल सदाशिव वाणी. खेडगावातील किराणा व्यावसायिक. अनिल व शीतल या दाम्पत्याला एक मुलगा प्रज्वल. हम दो, हमारे दो. यायोगे त्याच्यापाठी दुसºया मुलीची आशा मात्र पुत्ररत्न झाले. दिसायला चुणचुणीत पण जन्मत:च हात-पाय असे व्यंग. अक्षरश: वेदनेला जन्म. या चिंतेत बाळाचे नाव ठेवायचादेखील विसर. नाहीतरी वेदना ती वेदनाच यास दुसरे नाव ते काय असणार? मग सुरू झाला वेदनांचा प्रवास. पतीला दुकान सोडता येत नसल्याने, शीतलने बाळासाठी गड उतरणारी हिरकणीसारखी आठवत हिंमत बांधली. हा दवाखाना तो दवाखाना. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, पुणतांबा ते उदयपूर... रेअर अर्थात दुर्मिळात दुर्मिळ असा स्नायुंच्या कमकुवतपणा म्हणून म्हसक्युलर डायस्ट्राँफी असल्याचे निदान होते. हा जवळजवळ बºयाच केसेसमधे असाध्य असाच आजार. महिना-महिना दवाखान्यात एकटीचा मुक्काम. यात सोबतीला असलेल्या मोठ्या प्रज्वलची हेळसांड. अंगावर काटा उभा करणाºया आठवणी. सहा महिन्यांनी पुण्यात दवाखान्यातच त्याचे नामकरण झाले. पुढे चालून हा मुलगा यश मिळवेल म्हणत डॉ.विजय थोरातांनी त्याचे नाव ‘यश’ ठेवले. आज-उद्या गुण लागेल ही भाबडी आशा. वेळ मिळेल तसे पती अनिल, आजोबा सदाशिव वाणी व कुटुंंबासह पाच वर्षे दवाखाने पालथे घातले. सहा-सात लाख उपचारावर मोडलेत. उदयपूरच्या नारायण सेवा संस्थानच्या डॉक्टरांनी अखेर ते भयान वास्तव मांडले. आयुष्यभर असाच राहणारे..! मुलाचे कसे होईल? या विचाराने आई शीतलचा धीर सुटला. काही क्षण अश्रुंचा बांध फुटला. पुढच्या क्षणात निश्चय झाला. त्याला शिक्षणात पुढे न्यायचे.शाळा दर शाळांचे उंबरठे झिजवलेमाहेर गोदातीर म्हणून शीतलने मुलाला घेऊन नाशिक गाठले. त्याला मातृभाषेतून शिक्षण देण्याचा विचार होताच. जेथे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे मुश्कील तिथे यशला अॅडमिशन देण्याची रिस्क कुणी घेईना. मुलाला शिक्षण देण्याची आईची इच्छा प्रबळ होती. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या गेटवर एक दिवस मुलासह बसत आग्रह धरला. संस्थाचालकांनी दयामाया दाखवत अखेर उत्तमनगरातील अभिनव बालविकास मंदिरात प्रवेश दिला. यशऐवजी अर्णव नाव शाळेच्या दाखल्यावर लागले. चार वर्षे मुलाच्या शाळेसाठी शीतल वाणी या कुटुंंबापासून दूर राहिल्यात.आई नावाची शाळा भरलीअर्णवला शाळेत नेणे, बेंचवर बसविणे, मधल्या सुट्टीत घास भरविणे, शि-शू आवरणे हे ओघाने आलेच. यासाठी एक वर्षभर ती शालेय वेळेत व्हरांड्यातच थांबून राहिली. तिची तळमळ पाहून शिक्षकांनीदेखील अर्णवकडे खास लक्ष पुरविले. मूळातच त्याची कुशाग्र बुद्धी. तो अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होत गेला. शाळेजवळच रहायची खोली केली. दुसरीनंतर ती खोली ते शाळा अशी अर्णवला वरीलप्रमाणे गरज वाटेल तेव्हा जात राहिली. अर्णवची शाळा एके शाळा असा शीतलचा दिनक्रम राहिला. पाचवीला मात्र कौटुंबिक कारणांनी खेडगावी ब.शी. हिरे विद्यालयात अर्णवला घातले. येथे तिचे कष्ट थोडे हलके झाले. मोठा भाऊ प्रज्वल वर्गमित्र पृथ्वीराज माळी, रुपेश हिरे हे वह्या-पुस्तक काढणे, पाणी पाजणे, हालचालीस मदत करू लागली. मुख्याध्यापक अरविंद खंडाळे यांनी विशेष लक्ष घातले. वर्गशिक्षक मनोज महाजन यांनी माझी शिष्यवृत्ती परीक्षेची चांगली तयार करुन घेतल्याने हे यश मिळाल्याचे अर्णव सांगतो. आता सहावीच्या वर्गशिक्षिका माधुरी सूर्यवंशी, शिक्षकवर्ग व शाळेतील सर्वजण माझी काळजी घेतात, हे आवर्जून सांगण्यास तो विसरत नाही.मुलासाठी वाट्टेल ते...आई शीतलने किराणा दुकान, घरकामाबरोबरच मुलासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. तो १२ वर्षांचा झालाय तरी आजतागायत त्याचे प्रातर्विधी आटोपणे, ब्रश करणे, न्हाणे-धुणे, घास भरविणे हे सर्वकाही ती बघते. अर्णवला लहानपणापासून ते आजवर उचलून उचलून तिलाच मान, पाठ, मणक्याचे दुखणे जडलंय. रात्रीतून चार-पाच वेळा अर्णवची कुस बदलणे यामुळे झोपदेखील पारखी झालीय तरी वाटेल ते कष्ट झेलण्याची, त्याला शिकून मोठा करण्याची तिची जिद्द आहे.कुंटुंबाची खंतअर्णवला आजवर आर्थिक मदत वा कुठल्याही शासकीय सवलतीचा लाभ मिळालेला नाही. पूर्णपणे परावलंबी असताना, पुढे चालून हात-पायात सुधारणा होईल ह्या आधाराने त्याला फक्त ५० टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळालेले पाहून कुणालाही शासकीय यंत्रणेच्या एकूणच अनास्थेविषयी संताप आल्याशिवाय राहणार नाही. त्यास पेन धरण्यास मर्यादा पडत असल्याने यापुढे शासकीय परीक्षेत वेळ वाढवून मिळण्याची तरतूद आवश्यक आहे.मला वैज्ञानिक व्हायचंय, मोबाइल माझा सांगातीतुला काय व्हायचंय? यावर अर्णवचे उत्तर येते वैज्ञानिक. घरी बसल्या बसल्या तो मोबाइलवर इतर मुलांप्रमाणे नुसते गेम न खेळता माहितीच्या विश्वातील ज्ञानाची सफर करतो. बाबांचे रेशनदुकान असल्याने आॅनलाइन कामात तो मदत करतो. त्याला मिनीपॅड घेऊन दिलाय. यावरच त्याने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी केली. मोबाइल त्याचा शालेय शिक्षकानंतर दुसरा गुरू ठरलाय, तो स्वत: टेकगुरू आहे. इन्स्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मला जॉर्इंट असल्याचे तो सांगतो. मोबाइल चेस (बुद्धिबळ) मध्ये तो समोरच्या प्रत्येकाला हरवतो. त्याने खाऊसाठी मिळणाºया पैशातून ११ हजार जमवले. त्यातून लॅपटॉप घ्यायचाय. वायर, भिंग, खोके, बल्ब असा प्रयोग व त्यासाठी बाबांच्या मागे त्याचा तगादा सुरू असतो. त्याला सुयश चिंतीत ‘लोकमत’ची ही पाठीवरची थाप..!
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती : माता शीतलच्या ममत्वापुढे विद्येची देवी नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 4:14 PM
जन्मताच तो दिव्यांगा पलिकडचा आहे. तरीदेखील तो इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत भडगाव तालुक्यात पाचवा आलाय. यासाठी मात्र त्याची माता शीतलने आ... आईचा... आ...ही अक्षरओळख. मुलासाठी नानाविध खस्ता खात. मातृत्वाच्या कसोटीला खरे उतरत जगाला करुन दिलीय.
ठळक मुद्देवेदनांच्या अथांग ‘अर्णवा’त सरस्वतीचा खळखळाटमला वैज्ञानिक व्हायचंय, मोबाइल माझा सांगाती