म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर आता १४ दिवस होणार उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:18+5:302021-06-01T04:13:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सीटू कक्षात पोस्ट कोविड म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण वाढले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सीटू कक्षात पोस्ट कोविड म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण वाढले आहेत. या रुग्णालयात एकत्रित रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली आहे. दरम्यान, एका पुरुष रुग्णावर आज, मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, ही म्युकरची जीएमसीतील तिसरी शस्त्रक्रिया असेल. रुग्ण वाढत असले तरी इंजेक्शनमध्ये कुठलाही खंड नसल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.
एम्फोटेरिसन बी या औषधावर आता शासकीय नियंत्रण असल्याने अधिकांश रुग्ण हे शासकीय यंत्रणेतच उपचार घेत आहेत. त्यामुळे या इंजेक्शनची खासगीतील मागणी जवळपास बंदच झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. रुग्णांच्या तुलनेत पुरवठा होत असल्याचेही ते म्हणाले. प्राधान्याने शासकीय यंत्रणेलाच इंजेक्शन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, म्युकरच्या कोणत्याही रुग्णावर किमान १४ दिवस उपचार करण्याच्या नवीन गाईडलाईन्स आल्या आहेत. आधी ही वेळ २१ दिवसांची होती. ती कमी करण्यात आली आहे. ही बुरशी नंतर पुन्हा वाढू नये म्हणून अधिक वेळ रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवावे लागते, असे जीएमसीचे उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी सांगितले.
पांढऱ्या बुरशीचे सध्या रुग्ण नाहीत
काळ्या बुरशीपेक्षा पांढऱ्या बुरशीचे रुग्ण हे कमी असून, याचे दोन रुग्ण या आधी जिल्ह्यात आढळले होते. मात्र, ते बरे झाले असून सध्या याचा एकही रुग्ण नाही, शिवाय या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीच्या तुलनेत सौम्य लक्षणे असतात, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. काळ्या बुरशीची लागण व पांढऱ्या बुरशीची लागण हे वेगवेगळे प्रकार असून, पांढऱ्या बुरशीची लागण ही केवळ जबड्यापर्यंतच असू शकते. मात्र, काळी बुरशी ही रक्तात, फुप्फुसांमध्येही जाऊ शकते व अधिक घातक ठरू शकते, असे औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले.