पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा पितृपक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:17 AM2021-09-19T04:17:37+5:302021-09-19T04:17:37+5:30
प्रसाद धर्माधिकारी लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद, जि.जळगाव : दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ...
प्रसाद धर्माधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद, जि.जळगाव : दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पितृपक्षास २१ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवड्याला भावनिक महत्त्व असून सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची सांगता होत असते. भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भाग असो वा शहरी पितृपक्ष पंधरवडा सर्वत्र पाळला जातो. दिवंगत व्यक्ती वाडवडिलांच्या पूर्वजांच्या मृत्यू तिथीला या पंधरवड्यात त्या त्या तिथीला श्राद्ध तर्पण केले जाते तर्पण केल्याने पितरांना सुख लाभते व ते संतुष्ट होतात, अशी भावना आहे.
पुढच्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य पूर्वीच्या पिढीने केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कालखंड आहे. तेव्हा मनात भीती न बाळगता पूर्वजांचे स्मरण व्हायला हवे.
श्राद्धाचे प्रकार...
श्राद्ध क्रियेत तत श्राद्धम म्हणजेच श्रद्धेने केलेले कार्य यालाच श्राध्द असे म्हणतात. औद्देहिक श्राद्ध ,संवंत्सारिक, पार्वणी, तीर्थ, त्रिपिंडी, हिरण्य श्राद्ध, महालय श्राद्ध आदी श्राद्धांचे प्रकार आहेत.
तिथींना महत्त्व ...
पितृपक्षात तिथींना अनन्य महत्त्व आहे. शस्त्राने मृत झालेले, संन्यास घेऊन मृत झालेले,माहेरपणी मृत्यू झालेले सवाष्णी, वगैरेंसाठी ठरावीक तिथीला श्राद्ध केले जाते. त्यात सर्वपित्री अमावस्या साऱ्या पितरांसाठी आहे.
तिथीनुसार श्राद्ध असे...
श्राद्ध हे तिथीनुसारच करावे असे शास्त्रवचन आहे. २१ सप्टेंबर रोजी महालय श्राद्धारंभ असून प्रतिपदा श्राद्ध आहे. २२ रोजी द्वितीया श्राद्ध, २३ रोजी तृतीया श्राद्ध ,२४ रोजी भरणी श्राद्ध व चतुर्थी श्राद्ध,२५ रोजी पंचमी श्राद्ध, २६रोजी षष्ठी श्राद्ध, २८ रोजी सप्तमी श्राद्ध, २९ रोजी अष्टमी श्राद्ध, ३० रोजी अविधवा नवमी अर्थात नवमी श्राद्ध ,१ ऑक्टोबर रोजी दशमी श्राद्ध, २ रोजी एकादशी श्राद्ध , ३ रोजी द्वादशी श्राद्ध ,संन्यासिनां महालय, ४ रोजी त्रयोदशी श्राद्ध, ५ रोजी चतुर्दशी श्राद्ध व शस्त्रादिहत पितृश्राद्ध, ६ रोजी सर्वपित्री दर्श अमावस्या श्राद्ध, ७ रोजी मातामह श्राद्ध आहे. सप्टेंबर २४ , २८, २९ व ऑक्टोबर ३ किंवा ६ यापैकी कोणत्याही एका दिवशी पौर्णिमेचे महालय श्राद्ध करता येईल.
तर्पण कार्यामध्ये वडील,आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी, आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी, काका, मामा, भाऊ, सासू-सासरे,पत्नी, मुलगा, मित्र, गुरु, शिष्य, आदी दिवंगत स्नेही जणांचा गोत्रासह नामोल्लेख करीत पाणी दिले जाते. पितृपक्षात कावळा पिंडाला शिवणे अत्यंत महत्त्वाचे असते.