(फोटो )
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून खाली पडल्याने या अपघातात पाय गमावलेल्या जगन चंद्रकांत पाटील (वय ३०, रा. समतानगर, जळगाव) या तरुणास न्यायालयाने तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली. तब्बल नऊ वर्षांनी जगन याला न्याय मिळाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन पाटील हे ३० डिसेंबर २०१२ रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेसने जळगाव ते कोपरगाव दरम्यान प्रवास करीत होते. चाळीसगाव स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून कापला गेला. या अपघातानंतर त्यांच्यावर चाळीसगावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचाराअंती त्यांचा पाय गुडघ्यापासून खाली पूर्णपणे कापण्यात आला. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला होता. पाटील यांच्याकडून प्रवासाचे तिकीटदेखील मिळून आले होते. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर पाटील यांनी मुंबईच्या रेल्वे क्लेम ट्रिब्युनलकडे नुकसानभरपाईचा दावा केला होता. सुनावणीअंती न्यायालयाने पाटील यांना ३ लाख २० हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली. दरम्यान, पाटील हे प्रवास करीत असलेल्या दिवशी संबंधित रेल्वेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. गाडीत गर्दी झालेली असल्यामुळेच पाटील हे खाली पडले. त्यामुळे त्यांना चार लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा युक्तिवाद पाटील यांचे वकील ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांनी केला होता. सुनावणीअंती ३ लाख २० हजार रुपयांची भरपाई देण्यात आली.