ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सिजन पुरवठ्याचे बिल अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:29+5:302021-07-01T04:12:29+5:30
रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ जम्बो सिलिंडरद्वारे रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करून घेतला होता. त्यामुळे एकाचवेळी ग्रामीण ...
रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ जम्बो सिलिंडरद्वारे रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करून घेतला होता. त्यामुळे एकाचवेळी ग्रामीण रुग्णालय व इंदिरा भुवन असे दोन कोविड हेल्थ सेंटर चालविण्यात आले. त्यामुळे शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले; मात्र या ऑक्सिजन पुरवठ्याच्या रिफिलिंगचे बिल कसे अदा करावे, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनास पडला असताना प्रा. ललित मोमाया यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केल्याने पुरवठादारास बिल अदा करणे शक्य झाले आहे.
याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे यांनी माहिती देताना सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात जवळपास ५० टक्केच्या वर ऑक्सिजनचा तुटवडा होता. त्यात अमळनेर येथे रुग्णसंख्या मोठी आणि ऑक्सिजनची आवश्यकतादेखील अधिक असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त, नाशिक यांच्या मार्फत अमळनेर ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड हेल्थ सेंटरला ३५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करून घेतला होता. त्यामुळे एकाचवेळी दोन कोविड हेल्थ सेंटर सुरू झाली. सिलिंडर संपल्यानंतर जवळपास एक महिन्यापर्यंत पुन्हा पुन्हा रिफिलिंग करावी लागली. प्रत्यक्षात यासाठी निधीची तरतूद नसताना डॉ. ताडे यांनी क्रेडिटवर हे सिलिंडर रिफिलिंग करून घेतले होते. संबंधित ऑक्सिजन पुरवठादार एजन्सीकडून रुग्णालय प्रशासनास बिल प्राप्त झाल्याने हे १८ हजार ७१२ रुपये बिल प्रा. मोमाया यांनी धनादेशाद्वारे अदा केले आहे. या वेळी साईश किरण पाटील व हिमांशू किरण पाटील उपस्थित होते.