१३३ दिवसांनतर पूर्णवेळ व्यवसायाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:57+5:302021-08-14T04:21:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल्स १५ ऑगस्टपासून दररोज रात्री १० पर्यंत सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल्स १५ ऑगस्टपासून दररोज रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मंगल कार्यालये, इनडोअर खेळ यांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स बंदच राहणार आहे. ४ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे बंधने आलेल्या व्यावसायिकांना १३३ दिवसांनतर सप्ताहातील सातही दिवस पूर्णवेळ व्यवसाय करण्याची परवानगी मिळाल्याने स्वातंत्र्यदिनापासून अनेक निर्बंधापासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र मिळणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहे.
१५ ऑगस्टपासून संपूर्ण सप्ताहभर व तेदेखील रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या विषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १३ ऑगस्ट रोजी आदेश काढले.
हॉटेल, रेस्टारंट, बारसाठी ५० टक्के क्षमता
सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स सप्ताहातील सातही दिवस रात्री १० पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. सोबतच हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तसेच खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली असून लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. कमी उपस्थितीत आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये खासगी कार्यालये सुरू राहू शकणार आहे.
विवाह सोहळ्यासाठी मर्यादा वाढविली
मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेने व जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यासदेखील १०० जणांच्याच उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.
बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॅश, पॅरलाल बार, मल्लखांब यासारख्या इनडोअर खेळांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र या खेळांसाठी केवळ दोन खेळाडूंची मर्यादा ठरवून दिली आहे.
हे राहणार सुरू
- सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत सुरू
- हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
- शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश
- मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेत जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीला परवानगी
- खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यासाठी १०० लोकांच्या उपस्थितीस मुभा
- खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या २४ तास सुरू ठेवता येणार
- बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी
- जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
- मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहणार
यांना अद्याप परवानगी नाहीच
धार्मिकस्थळे, सिनेमागृह, मल्टीप्लेक्स सुरू करण्यात अजूनही परवानगी मिळालेला नाही. त्यामुळे ते बंदच राहणार आहे.
नियम मोडल्यास ५०० रुपये दंड शिथिलता देताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांविषयीदेखील निर्देश देण्यात आले आहेत. विनामास्क फिरणे, गर्दी करणे, उघड्यावर थुंकणे असे प्रकार आढळून आल्यास संबंधितास ५०० रुपयांचा दंड करण्यात येईल, असा इशाराही आदेशाद्वारे देण्यात आला आहे.