भोपाळहून अपहरण झालेल्या विमानाचे जळगावला `लँडिंग`

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:41+5:302021-01-25T04:16:41+5:30

जळगाव : भोपाळहून मुंबईला निघालेल्या विमानाचे अपहरण झाल्याचा संदेश मिळाला आणि अपहरणकर्त्यांनी पायलटला हे विमान जळगाव विमानतळावरच उतरविण्यास सांगितले. ...

The plane hijacked from Bhopal landed at Jalgaon | भोपाळहून अपहरण झालेल्या विमानाचे जळगावला `लँडिंग`

भोपाळहून अपहरण झालेल्या विमानाचे जळगावला `लँडिंग`

Next

जळगाव : भोपाळहून मुंबईला निघालेल्या विमानाचे अपहरण झाल्याचा संदेश मिळाला आणि अपहरणकर्त्यांनी पायलटला हे विमान जळगाव विमानतळावरच उतरविण्यास सांगितले. ही घटना तत्काळ विमानतळाच्या संचालकांनी जिल्हा प्रशासनाला कळविल्यानंतर तत्काळ यंत्रणा हलली अन् विमानतळाकडे कूच झाली. मात्र, अपहरणकर्त्यांचे इरादे सुरक्षा यंत्रणेने फोल ठरविले आणि काही वेळातच अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळून प्रवाशांची सुटका केली. अतिशय थरारक असा प्रकार शनिवारी दुपारी जळगाव विमानतळावर घडला. मात्र, हे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गेल्या महिन्यात जळगाव विमानतळावर ‘बॉम्ब ठेवल्याचे’ मॉकड्रील घेण्यात आल्यानंतर, २३ जानेवारी रोजी विमानाच्या अपहरणाचे मॉकड्रील घेण्यात आले. विमानतळाच्या नियंत्रण कक्षामध्ये भोपाळहून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे अपहरण झाल्याचा पायलटचा संदेश मिळाला. अपहरणकर्त्यांनी पायलटला जळगाव विमानतळावर विमान उतरविण्याच्या सूचना देऊन, धावपट्टीच्या वेगळ्या सुरक्षित ठिकाणी विमान पार्क करायला सांगितले. या घटनेची माहिती विमानतळाचे संचालक सुनील मगरीवार यांनी तत्काळ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्र‌वीण मुंढे, गुप्तचर यंत्रणा व इतर विभागांना दिली. घटनेची गांभीर्य लक्षात घेता, तत्काळ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर सर्व यंत्रणा विमानतळावर दाखल झाल्या. यावेळी विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुमित कुमार तिवारी यांनी परिस्थिती लक्षात घेऊन, सर्वांना सावधान राहण्याच्या सूचना केल्या.

यावेळी अपहरणकर्त्यांनी त्यांच्या साथीदाराला तिहार जेलमधून मुक्त करण्यासह विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बराच वेळ अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी केल्या.

इन्फो :

अन् जेवणाच्या बहाण्याने अतिरेकी जेरबंद

जिल्हाधिकारी अपहरणकर्त्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी वाटाघाटी करत असताना, अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना जेवण पाठविण्यासाठी परवानगी दिली. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सापळा रचून, साध्या वेशात जेवण पाठविण्यासाठी कमांडोंना पाठविले. कमांडोंनी विमानात जाताच, सर्व अतिरेक्यांना जेरबंद केले आणि प्रवाशांची सुटका केली. ही मोहीम जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणपुरे, मुख्य सुरक्षा अधिकारी प्रताप शिरूरे यांनी विविध विभागांच्या मदतीने यशस्वीरीत्या फत्ते केली.

इन्फो :

त्रुटींचा घेतला आढावा

या मॉकड्रीलनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्रुटींचा आढावा घेतला. मॉकड्रीलमध्ये आढळून आलेल्या त्रुटींबद्दल चर्चा करून, संबंधित विभागांना त्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: The plane hijacked from Bhopal landed at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.