PM ऋषी सुनक यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, हाऊ इज UT?, CM शिंदेंनी दिलं 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 07:38 PM2023-09-12T19:38:28+5:302023-09-12T19:51:55+5:30

सोशल मीडियावर ह्या भेटीचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यावरुन, टीका करणाऱ्यांना आता मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलंय. 

PM Rishi Sunak's question to the Chief Minister, How is UT?, CM Shinde gave this answer | PM ऋषी सुनक यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, हाऊ इज UT?, CM शिंदेंनी दिलं 'हे' उत्तर

PM ऋषी सुनक यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, हाऊ इज UT?, CM शिंदेंनी दिलं 'हे' उत्तर

googlenewsNext

जळगाव - राजधानी दिल्लीत यंदा जी२० परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जी२० परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आल्याने ही परिषद दिल्ली येथे संपन्न झाली. या परिषदेसाठी जगभरातील देशांचे प्रमुख दिल्लीत आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेही दिल्लीत होते. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीऋषी सुनक यांची भेट घेतली. सोशल मीडियावर ह्या भेटीचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यावरुन, टीका करणाऱ्यांना आता मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलंय. 

जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या फोटोचा संदर्भ देत `ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो तर काढला, पण त्यांच्याशी काय बोललातं? कोणत्या भाषेत बोलला, काय बोलला तेही कळू द्या. बरं सुनक काय बोलले ते तुम्हाला कळलं का? की नुसतं चमकोगिरी करण्यासाठी फोटो काढला`, अशा शब्दात शिंदेंची खिल्ली उडवली होती. आता, त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. शिंदे यांनीही जळगाव येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमातूनच ठाकरेंवर निशाणा साधला. 

दिल्लीतील जी२० परिषदेच्या कार्यक्रमात मला ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भेटले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याने मला त्यांना भेटून आनंद झाला. तर, आपला माणूस तिथला पंतप्रधान असल्याचा अभिमानही वाटला. त्यांनीही मला भेटून समाधान व्यक्त केलं. मात्र, त्यावरुनही माझ्यावर टीका करायला सुरूवात केली. हे त्यांना काय भेटले, कसे भेटले, काय बोलले?, कुठल्या भाषेत बोलले? असे प्रश्न विचारू लागले. या अशा प्रश्नांना काही अर्थ आहे का?, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथील कार्यक्रमात उपस्थित केला. 

मी यावर बोलणार नव्हतो, पण त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो, ऋषी सुनक यांनी मला विचारलं, हाऊ इज UT?, आता युटी म्हणजे काय? असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारला. त्यावर, काहींनी उत्तर देताना उद्धव ठाकरे असं म्हटलं. त्यानंतर, मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर देताना गौप्यस्फोटच केला. ऋषी सुनक यांना मी मला म्हटलं, Why? त्यावर, सुनक म्हणाले, ते दरवर्षी लंडनला येतात, मोठमोठ्या प्रॉपर्टीज बनवतात. थंडगार हवा खातात, त्यांचं सगळं माझ्याकडे आहे, एकदा लंडनला आलात की मी सगळं सांगतो, असं उत्तर एकनाथ शिंदेंनी ऋषी सुनक यांचा दाखला देत दिलं. तसेच, आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, नाहीतर पाटणकर काढा घेण्याची वेळ तुमच्यावर येईल, असा इशाराच मुख्यमंत्री शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना दिला. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना कुठली भाषा वापरता याचं तारतम्य ठेवा. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी तुमचा शब्द कधी पडू दिला नाही. मात्र, त्यांच्याबद्दल तुम्ही काय भाषा वापरता, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.   

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

शासनाने एक रुपयात पीक विमा ही योजना आणली, एनडीआरएफच्या निकषापेक्षा मदत दिली. कमी पाऊस पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला असला तरीही सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील महायुती सरकारने शासनाने ३५ जल सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यातून ८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी जळगावातील कार्यक्रमात बोलताना सांगितले. 

Web Title: PM Rishi Sunak's question to the Chief Minister, How is UT?, CM Shinde gave this answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.