लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तिसऱ्या लाटेत बालकांचे संरक्षण व्हावे, त्यांना न्युमोनियापासून सुरक्षितता मिळावी यासाठी बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात न्युमोकोकल लसीचा समावेश करण्यात आला आहे. या लसींचा पुरवठा शहरालाही झाला असून, गुरुवार १५ जुलैपासून ही लस शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही उपलब्ध होणार आहे.
गुरुवारी या लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. सोमवार व गुरुवार अशी दोन दिवस ही लस विविध केंद्रांवर उपलब्ध राहणार आहे. दरम्यान, ही लस एक वर्षाच्या आतील बाळांना द्यायची असल्याने शिवाय पहिलाच डोस असल्याने दीड महिन्यांच्या बालकांपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यात ६५ हजार बालके
या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. जिल्ह्यात एक वर्षाच्या आतील एकूण ६५ हजार बालके आहेत. त्यांचा हा लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ४९०० लसी घेण्यात आल्या आहेत. नियमित लसीकरणात या लसीचा समावेश झाल्याने नेहमीप्रमाणे या लसी जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.