नांदेड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात खान्देशातील दोघांच्या कविता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:58 PM2020-07-11T17:58:21+5:302020-07-11T18:02:56+5:30
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात खान्देशातील ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर आणि शशिकांत हिंगोणेकर यांच्या कवितांची निवड झाली आहे.
जळगाव : स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात खान्देशातील ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर आणि शशिकांत हिंगोणेकर यांच्या कवितांची निवड झाली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमापासून या कविता असतील.
उत्तम कोळगावकर यांच्या ‘जंगलझडी’ या काव्यसंग्रहातील ‘काळजाच्या विस्कटलेल्या चिंध्या’ या कवितेची निवड झाली आहे. ही कविता यापूर्वी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई या ठिकाणीही अभ्यासक्रमात होती. कवी कोळगावकर यांनी जळगाव, धुळे व नाशिक येथे आकाशवाणी केंद्रात कार्यक्रम अधिकारी, केंद्र संचालक म्हणून सेवा केली आहे.
कवी शशिकांत हिंगोणेकर यांची ‘मी वाट पाहतोय’ ही कविता ऋतूपर्व या काव्यसंग्रहातून घेतली आहे. तसेच मुंबई, पुणे, जळगाव आणि अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कविता अभ्यासक्रमात आहेत. इ. स. २०१७ ला महाराष्ट्र शासनाने कवी केशवसूत पुरस्काराने सन्मानित केले आहे. हिंगोणेकर यांनी शिक्षणाधिकारी, विभागीय सचिव, लातूर बोर्डासह विविध पदांवर काम केले आहे.