कवितेनं लळा लावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:39 PM2019-12-31T23:39:58+5:302019-12-31T23:40:17+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात आपल्याला लिखाणाची प्रेरणा नेमकी कशी सुचली याविषयी लिहिताहेत ज्येष्ठ साहित्यिक शैलजा करोडे...
माझ्या लेखन प्रवासात अनेकांचा हातभार लागलाय. माझे माता-पिता, माझी भावंडे, मित्र परिवार, गुरुजन, साहित्य क्षेत्रातील मान्यवर इ.
कवितेत रमणे हा माझा आवडता छंद. शालेय जीवनात मला लाभलेले गुरुजन ही कविता खूप चांगल्याप्रकारे समजावून सांगायचे. यामुळेच कवितेचा लळा लागला. मनातील भावनांचे उत्कट प्रकटीकरण होऊ लागले. संवेदनशील मनातून उत्स्फूर्त भावोद्गार व्यक्त होऊ लागले. कवितेनं प्रेम दिलं. माया दिली. मायेची सावली दिली. संघर्ष करण्याची शक्ती दिली. तप्त ग्रीष्मातही गारव्याची झुळूक आली आणि माझं भावविश्वच बदललं. कवितेच्या प्रकाशानं जीवन अंतर्बाह्य उजळून निघालं. प्रतिभेला धुमारे फुटले, अन् माझीच मला नव्यानं ओळख झाली. कवितेच्या शीतल गारव्यानं करपलेलं मन तरारून आलं. वेदनेची वाट मोकळी झाली अन् मोरपीसासारखं मन हलकं हलकं झालं. भावनेच्या हिंदोळ्यावर झुलताना नवी नवी क्षितिजं गवसत गेली अन् कवितेशी नातं अधिकच दृढ होत गेलं. कविता माझ्या श्वासा श्वासात वसत गेली. धमन्यांमधून वाहून अंत:स्थ फुलून येऊ लागली. आता कवितेशिवाय जगणं ही कल्पनाही करवत नाही. मी आणि कविता, कविता आणि मी यांचं नातं आता जीवन आणि श्वासाचं झालंय.
तीव्र प्रकाशातून काळोखात प्रवेश करताना कातर सायंकाळ उजळते ती दिव्यांच्या मंगल प्रकाशात अन गवसत जातो अंधाऱ्या मनाला प्रकाशाचा एक एक कवडसा. मनाच्या आभाळात हळूहळू एकत्रित येतात. कवितेच्या चांदण्या आणि या चांदण्यांची गुंफण होते कवितांच्या आकाशगंगेत.
कवितेचं एक एक चांदणफूल गुंफताना मला प्रकाशाचा एक एक धागा गवसत गेला आणि मनाची कातर सायंकाळ जणू सांजवातीनं उजळून निघाली. कवितेच्या प्रवासात अनेक खाचखळगे अनुभवताना ध्येयपूर्तीचं क्षितिज सारखं खुणावतयं आणि कवितेच्या कक्षा सारख्या रुंदावत आहेत.
-शैलजा करोडे, जळगाव