जळगावात ‘मविप्र’ कार्यालयाचा पोलिसांनी केला पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:07 PM2018-02-18T23:07:12+5:302018-02-18T23:09:03+5:30
संस्थेचा ताबा घेण्याच्या कारणावरुन मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयात शनिवारी झालेल्या तोडफोड प्रकरणात रविवारी जिल्हा पेठ पोलिसांनी कार्यालयात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, संस्थेच्या दोन्ही गटाचा वाद पाहता संस्थेच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि १८ : संस्थेचा ताबा घेण्याच्या कारणावरुन मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयात शनिवारी झालेल्या तोडफोड प्रकरणात रविवारी जिल्हा पेठ पोलिसांनी कार्यालयात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, संस्थेच्या दोन्ही गटाचा वाद पाहता संस्थेच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
‘मविप्र’ ही संस्था दोन कायद्यान्वये नोंदणी असल्याने धर्मदाय आयुक्तांच्या कायद्याप्रमाणे निलेश भोईटे यांनी संस्थेवर हक्क सांगितला आहे तर सहकार कायद्याने निवडणुकीत आपला गट विजयी झाल्याने त्यावर नरेंद्र भास्कर पाटील गटाने हक्क सांगितला आहे. या वादात शनिवारी भोईटे गटाने संस्थेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भोईटे गट व नरेंद्र पाटील गटात वाद झाला. यात संस्थेच्या कार्यालयाचे तसेच सभागृहाचे कुलूप तुटले आहे, भोईटे गटाने चेअरमन जगन्नाथ गंगाराम पवार व मानद सचिव निलेश रणजित भोईटे यांच्या नावाच्या पाट्या लावल्या तसेच त्यांच्या गटाचे संचालक मंडळाचे बॅनरही लावले होते. हे बॅनर फाडण्यात आले आहे. उपनिरीक्षक गिरधर निकम, एन.बी.सूर्यवंशी, महेंद्र बागुल, शिवाजी धुमाळ, उमेश पाटील आदींचा ताफा पंचनाम्यासाठी गेला होता. यावेळी भोईटे गटाकडून जयवंत भोईटे व नरेंद्र पाटील गटाकडून मनोज पाटील यांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.
भोईटे गटातर्फे २३ तर पाटील गटातर्फे ११ जणांविरुद्ध तक्रार
या वादात नरेंद्र पाटील गटाने १० हजार रुपये रोख व सोन्याची साखळी काढून पलायन केल्याची तक्रार निलेश भोईटे यांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी या गटाकडून मारहाण देखील झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर लिपीक पराग रवींद्र कदम यांनीही दिलेल्या तक्रारीत योगेश भोईटे व संजय निंबाळकर यांनी मारहाण करुन ५ हजार रुपये तर राजेंद्र वराडे व रमेश धुमाळ यांनी दोन तोळ्याची सोन्याची साखळी ओढून नेल्याची तक्रार दिली. कदम यांनी ११ जणांविरुध्द तक्रार दिली आहे तर निलेश भोईटे यांनी २३ जणांविरुध्द तक्रार दिली आहे.