पोलिसांनी मृत शेतकऱ्याचा सात तास पंचनामाच केला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:38+5:302021-07-29T04:17:38+5:30
धरणगाव येथील शेतकरी सतीश सुरेश महाजन यांनी २५ जुलै रोजी रात्री ८ वाजता शेतातील पिकांवर फवारण्याचे विषारी औषध प्राशन ...
धरणगाव येथील शेतकरी सतीश सुरेश महाजन यांनी २५ जुलै रोजी रात्री ८ वाजता शेतातील पिकांवर फवारण्याचे विषारी औषध प्राशन केले होते. अत्यवस्थ असल्याने सतीश महाजन यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. २८ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लागलीच पोलिसांना दिली. रात्री ८ ते सकाळी ८ जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची रुग्णालयात ड्युटी होती. तर सकाळी ८ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याची ड्युटी लागली. ज्या कर्मचाऱ्याच्या ड्युटीत घटना घडली, त्यानेच पंचनामा करणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित कर्मचाऱ्याने मात्र वेळकाढू धोरण अवलंबले. सकाळी सात वाजता नातेवाइकांनाच पंचनाम्याचे कागद आणायला लावले. एक तास टाइमपास करून आठ वाजता ड्युटी संपल्यानंतर पंचनामा न करताच हा कर्मचारी निघून गेला.
मृत्यू पहाटे चार वाजता पंचनामा दुपारी एक वाजता
इकडे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. सकाळी आठ वाजता आलेल्या कर्मचाऱ्याकडे नातेवाईक गेले असता मृत्यू पहाटे चार वाजता झालेला आहे, त्यामुळे ज्याच्या ड्युटीत घटना घडली तोच कर्मचारी प्रक्रिया करेल, असे या कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे नातेवाईक आणखीनच त्रस्त झाले. रुग्णालयात दिसेल त्या पोलिसाकडे त्यांनी याचना केली, मात्र त्या पोलिसांचा नाइलाज झाला. त्यामुळे नातेवाइकांनी पत्रकारांच्या माध्यमातून कारागृहातील बंदी आत्महत्या प्रकरणामुळे बंदोबस्तासाठी रुग्णालयात आलेले जिल्हा पेठचे निरीक्षक विलास शेंडे यांची दुपारी १२ वाजता भेट घेतली. तेव्हा शेंडे यांनी त्यांचा कर्मचारी उपलब्ध करून दिला. त्यानंतर १ वाजता ही प्रक्रिया पार पडली. पोलिसांच्या या कार्यपद्धतीविषयी नातेवाइकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सतीश महाजन यांनी विषप्राशन का केले होते, ते कळू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात आई कमल, वडील सुरेश धना महाजन व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.