धुमश्चक्रीनंतर पोलीस कठोऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:57+5:302021-06-06T04:13:57+5:30
चोपडा : तालुक्यातील कठोरा येथील तापी नदीत चोपडा पालिका चोपडा शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी न.पा.तर्फे एक पंपहाउस आणि पूर्वीची ...
चोपडा : तालुक्यातील कठोरा येथील तापी नदीत चोपडा पालिका चोपडा शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी न.पा.तर्फे एक पंपहाउस आणि पूर्वीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र वाढीव पाणीपुरवठा याेजनेत पुन्हा नवीन पाइपलाइन आणि पंपहाउस मंजूर आहे. परंतु कठोरा ग्रामस्थांचा या नवीन पाइपलाइन खोदण्यास विरोध आहे. पालिका प्रशासन पोलीस बंदोबस्तासह ४ जून रोजी खोदकामासाठी गेले असता ग्रामस्थांनी व महिलांनी प्रखर विरोध केला. त्यात पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झाली. मात्र ग्रामस्थांचा विरोध आणि संताप पाहून पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन आणि तहसीलदार यांना माघारी परतावे लागले. आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसोबत बैठक होऊन चर्चा होणार आहे व त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे ठरले आहे. यानंतर ५ रोजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे कठोरा येथे दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.
याआधी ग्रामस्थांचा एवढा तीव्र विरोध या नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी का असावा, हे जाणून घेतले असता असे समजले की, ज्या डोहातून नगरपालिका पाइपलाइनद्वारे पाणी उचल करते त्या डोहाजवळ बंधारा टाकला जातो, तो पालिका दरवर्षी टाकत असते. परंतु तो वाळूचाच असल्याने पुराच्या पाण्यात वाहून जातो. नंतर हा डोह कोरडा ठाक झाल्याने गावासही पाण्याची अडचण निर्माण होते.
तसेच यापूर्वी एक पाइपलाइन असताना व एक पंपहाउस असताना पुन्हा पंपहाउस व पाइपलाइन टाकण्याची गरज काय? त्यामुळे कठोरा परिसरात कूपनलिकाचे पाणी खोल जात आहे व भविष्यात बागायत शेती पाण्याअभावी बंद होईल या भीतीने ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा पाइपलाइनसाठी तीव्र विरोध होत असल्याचे समजले आहे.
चोपडा न.पा. पाणीपुरवठ्यासंदर्भात जळगाव अतिरिक्त पोलीस अधीक्षक व अमळनेर साहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी घेतली ग्रामस्थांची भेट
पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी चोपडा तहसीलदार, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोरा गावात ४ रोजी मोठा फौजफाटा लावून बंदोबस्त लावला होता. त्यामुळे काही काळ मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कालपासून कठोरे गावात खूप भीतीचे वातावरण आहे. ५ रोजी जळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे व अमळनेर येथील साहाय्यक पोलीस अधीक्षक राकेश जाधव यांनी दुपारी १२.३० ते २.०० वाजेदरम्यान कठोरा गावाला भेट देऊन ग्रामपंचायत ओट्यावर बैठक घेऊन शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. दीड ते दोन तास ग्रामस्थांशी संवाद साधला.
सचिन गोरे यांनी गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्या नीटपणे ऐकून घेतल्या आणि सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडणार आहेत. पुढची बैठक ही जिल्हाधिकारी यांच्यासोबत होणार असल्याची ग्वाही दिली.
बैठकीला पोलीस निरीक्षक सचिन गोरे, अमळनेर येथील साहाय्यक पोलीस अधीक्षक राकेश जाधव, चोपडा ग्रामीणचे पो.स्टे.चे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप आराक आणि नगरपालिकेचे अभियंता सचिन गवांदे तसेच पाइपलाइन टाकणारे कंत्राटदार, गावाकडून माहिती सांगण्यासाठी तरुण कार्यकर्ते दीपक मदन पाटील, शेतकरी अशोक गोरख पाटील, अरुण धनगर, दिनेश पाटील, योगेश पाटील, गोपाल पाटील, नीलकंठ पाटील, सरपंच पती अधिकार पाटील, उपसरपंच राजेंद्र रामदास बाविस्कर, पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते.