गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरुन पुन्हा चुलीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:24 AM2021-02-23T04:24:20+5:302021-02-23T04:24:20+5:30

लोगो - रियालिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : देशभरातील गोरगरीब जनतेला स्वयंपाकाचा गॅस मिळून चुलीवरचा स्वयंपाक टाळला जावा ...

Poor 'Ujjwala' from gas to stove again! | गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरुन पुन्हा चुलीवर !

गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरुन पुन्हा चुलीवर !

Next

लोगो - रियालिटी चेक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : देशभरातील गोरगरीब जनतेला स्वयंपाकाचा गॅस मिळून चुलीवरचा स्वयंपाक टाळला जावा व पर्यावरणाचेही संतुलन राखले जावे, यासाठी राबविण्यात आलेल्या उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गरजूंना लाभ तर मिळाला, मात्र सिलिंडरचे वाढते दर लाभार्थ्यांना परवडेनासे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ३२ हजार लाभार्थ्यांसमोर आर्थिक चिंता उभी राहिली असून, बहुतांश गृहिणी पुन्हा गॅसवरून चुलीकडे वळल्या आहेत.

स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून, यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. यामुळे पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबावेत व वनांचे रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले. मात्र, सातत्याने होणाऱ्या सिलिंडरच्या भाववाढीमुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ मिळालेली कुटुंबे आता गॅस महागल्याने पुन्हा चुलीकडे वळली आहेत.

गॅस आवाक्याबाहेर

गॅस कनेक्शन मिळाले मात्र सिलिंडरचे वाढते दर चिंतेची बाब ठरत आहेत. गेल्या सात महिन्यांतील सिलिंडरचे दर पाहता त्यात होत असलेली वाढ डोकेदुखी ठरत आहे. गेल्यावर्षी जानेवारी २०२०मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२०पर्यंत कमी होऊन ५९९.५० रुपयांवर आले होते. त्यानंतर मात्र हे दर वाढतच असून, जानेवारी २०२१मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर चालू महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१मध्ये सिलिंडरचा दर ७७४.५० रुपयांवर पोहोचला आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर

जानेवारी २०२० - ७१४.५०

जुलै - २०२० - ५९९.५०

जानेवारी - २०२१- ६९९.५०

फेब्रुवारी - २०२१ - ७७४.५०

पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे जिल्ह्यातील लाभार्थी - २ लाख ३२ हजार

सर्व कमाई गॅसवरच

लाभार्थी कुटुंबाचे महिन्याचे उत्पन्न जेमतेम असते. त्यात घरातील दररोज लागणारा किराणा, दूध, भाजीपाला यांचा ताळमेळ बसविणे कठीण होत असताना आता गॅस सिलिंडरचे दर कसे परवडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. सिलिंडर घेतला तर त्यावर अधिक खर्च करणे कसे शक्य होईल, असेही लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. मोलमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना महागडा गॅस वापरणे परवडत नसल्याने शेवटी चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आल्याचे ममुराबाद येथील पार्वताबाई पाटील यांनी सांगितले.

————-

उज्ज्वला योजनेतून सिलिंडर मिळाल्याने खूप आनंद झाला होता. मात्र, सिलिंडर खूप महाग झाल्याने आता परवडत नाही. महागडा गॅस वापरणे परवडत नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आमच्यासारख्यांवर आली आहे.

- पार्वताबाई पाटील

दररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची ठरत आहे. घरातील खर्च भागवतानाच नाकीनऊ येत आहेत. त्यात आता गॅस सिलिंडरचे दरही वाढल्याने गॅस वापरणे शक्य नाही. त्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

- शारदा चौधरी

दररोज मोलमजुरी करून कसाबसा उदरनिर्वाह होतो. मात्र, आता महागाई आवाक्याबाहेर जात असताना गॅस सिलिंडरचेही दर वाढल्याने त्याचा वापर न केलेलाच बरा, असे सर्वांनाच वाटत आहे.

- चित्रा पाटील.

आपल्याला गॅस मिळाला, याचा मोठा आनंद झाला. काही दिवस त्याचा वापर केला. मात्र, वर्षभरापासून सिलिंडरचे वाढते दर न परवडणारे आहेत. त्यामुळ‌े सिलिंडर भरणेही परवडत नसून, ते न वापरलेलेच बरे, या विचाराने गॅस सिलिंडर वापरणे बंद केले आहे.

- सुवर्णा कोळी.

मध्यंतरी सिलिंडरचे दर कमी झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला होता. त्यामुळे आता मिळालेल्या गॅसचा आपल्यालाही वापर करता येईल, याचा आनंद झाला होता. मात्र, गॅस सिलिंडरचे वाढते दर पाहता सिलिंडर वापरणे परवडणारे नाही.

- लता सोनवणे.

Web Title: Poor 'Ujjwala' from gas to stove again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.