जळगाव : जिल्ह्याने कोविड सुधारणांच्या बाबतीत राज्यात आघाडी घेतली असून, कोरोना रोखण्यात जिल्ह्याला यश येत आहे. २२ जूनच्या राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८ टक्के अर्थात एक टक्क्यापेक्षाही कमी नोंदविण्यात आला आहे. राज्यात केवळ तीनच जिल्हे हे एक टक्क्याच्या खाली असून, जळगाव त्यात दुसऱ्या स्थानावर आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे समाधानकारक चित्र गेल्या महिनाभरापासून समोर येत असून, अनलॉकच्या प्रक्रियेतही जिल्हा पहिल्या स्तरावरच कायम आहे. तपासण्यांवर अधिकाधिक भर देऊन रुग्णांना विलग करून, पुढील धोके टाळण्यात प्रशासनाला यश आले आहे. मार्च, एप्रिलमध्ये जळगाव शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा थेट ५० टक्के नोंदविण्यात आला होता. तो आता एक ते दीड टक्क्यांवर आला आहे. २२ जूनच्या आठवडाभराच्या अहवालानुसार जिल्हाभरात ३७,७२७ तपासण्या झाल्या असून, त्यात ३०१ बाधित आढळून आले आहेत. पाॅझिटिव्हिटी नियंत्रणात असल्याने निर्बंधांच्या बाबतीत जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
तिसऱ्या लाटेसाठी सज्जता
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा दिवसेंदिवस अधिक सक्षम करण्यावर भर देत असून, आगामी तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा सज्ज असल्याचे आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. यात जीएमसीत दोन प्रकल्प असून, दहा प्रकल्प जिल्ह्यात विविध ठिकाणी उभे केले जात आहे. यासह मोहाडी रुग्णालयात ऑक्सिजन टँकही उभा राहात आहे. शिवाय खासगी कोविड रुग्णालयांनाही ऑक्सिजन प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे. शिवाय बेड, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडवाढीबाबतही प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली. सर्वच तालुक्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रिकव्हरी रेटही ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
जळगाव शहरात मोठा दिलासा
रुग्णसंख्या व मृत्यूच्या बाबतीत गेल्या वीस दिवसांपासून विशेषत: शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. यात नियमित दहापेक्षा कमी रुग्ण समोर येत आहेत, तर वीस दिवसात तीन बाधितांचे मृत्यू झाले आहेत. मध्यंतरी दररोज सात ७ ते ८ मृत्यू नोंदविण्यात येत होते. ही संख्या कमी झाली आहे. जिल्ह्याचा विचार केला असता गेल्या तीन दिवसात एक मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात एकही मृत्यू नसल्याचे समाधानकारक चित्र होते.
पॉझिटिव्हिटी रेट कमी असणे का असतो दिलासा?
पॉझिटिव्हिटी रेट अर्थात शंभर तपासण्यांमध्ये आढळून येणारे बाधितांचे प्रमाण होय. एकत्रित जिल्ह्यात मार्च, एप्रिलमध्ये हाच पॉझिटिव्हिटी रेट ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. याचा अर्थ त्यावेळी शंभर तपासण्यांमध्ये ३५ रुग्ण आढळून येत होते. हा दर आता ०.८ नोंदविण्यात आला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होणे याचाच अर्थ की, कोरोना संसर्गाचे प्रमाण हे अत्यंत कमी झाले आहे. दिवसाला आता ५० पेक्षाही कमी बाधित आढळून येत आहेत. दुसरीकडे चाचण्या पाच हजारांपेक्षा अधिक होत आहे. यामुळे पॉझिटिव्हिट रेट हा कमी असणे हा मोठा दिलासा असतो.
राज्यातील टॉप दहा जिल्हे
नांदेड : ०.२ टक्के.
जळगाव : ०.८ टक्के
परभणी : ०.९ टक्के
नागपूर : १. ० टक्के
वर्धा : १.१ टक्के
हिंगोली १.२ टक्के
भंडारा : १.३ टक्के
चंद्रपूर : १.३ टक्के
नंदुरबार : १.६ टक्के
अमरावती : १.७ टक्के