चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे मारलेल्या नरभक्षक बिबट्याचे अज्ञातस्थळी शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:10 PM2017-12-10T17:10:26+5:302017-12-10T17:11:56+5:30
व्हीसेरा व केस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणार
जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील ७ जणांचे बळी घेणाºया नरभक्षक बिबट्याला हैद्राबादच्या शार्पशुटरने ठार मारण्यात यश मिळविल्यानंतर या बिबट्याचे शव नागरिकांपासून वाचवून रात्रीच अज्ञात स्थळी शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. त्याच ठिकाणी या बिबट्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाणार आहे. ७ बळी घेतले त्या ठिकाणाहून बिबट्याचे केस वनविभागाने गोळा केले होते. ते केस तसेच मृत बिबट्याच्या अंगावरील केस डीएनए चाचणीसाठी पाठवून मारलेला बिबट्या तोच नरभक्षक बिबट्या असल्याची खात्री करून घेतली जाणार आहे.
चाळीसगाव व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेल्या व ७ जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला हैद्राबाद येथील शार्प शूटर नवाब शहाफत अली खान व त्याचा मुलगा नक्षबंधू व पथकाने वरखेडे परिसरातील खडका शिवारात गाठून शनिवारी रात्री १०.२७ वाजता ठार केले होते.
रात्रीच अज्ञात स्थळी हलविले शव
छोटे वरखेडे येथे ज्या ठिकाणी वृद्ध महिलेला बिबट्याने ठार केले होते. त्या ठिकाणापासून जेमतेम २०० ते ४०० मीटर अंतरावरच बिबट्याला ठार करण्यात यश आले. मात्र लोकांमध्ये बिबट्याबद्दल प्रचंड रोष असल्याने त्याचे शव लोकांनी जाळून नष्ट करण्याची भिती असल्याने रात्रीच अज्ञात स्थळी हलविण्यात आले.
अज्ञात ठिकाणीच शवविच्छेदन व विल्हेवाट
बिबट्याचे शव जळगावकडे नेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात जळगावलाही न आणता अज्ञात स्थळी हे शव नेण्यात आले. तेथे ४-५ पशुवैद्यकीय अधिकारी, मेनका गांधी यांनी दिल्लीहून पाठविलेले पेटाचे वसीम खान, तसेच उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी व वनविभागाचे काही अधिकारी यांच्या उपस्थितीत शव विच्छेदन करण्यात आले. त्यात वाघाचा व्हिसेराही तपासणीसाठी घेण्यात आला आहे. तसेच त्याचे केसही डीएनए चाचणीसाठी पुणे अथवा हैद्राबाद येथील सीसीएमबी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जेणेकरून मारलेला बिबट्याच नरभक्षक बिबट्या होता, हे स्पष्ट होईल.
पंजाचे ठसे जुळले
वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई हे गेल्या महिनाभरापासून चाळीसगाव येथेच ठाण मांडून असून बिबट्यासाठी ट्रॅप लावण्याच्या कामात योगदान देत होते. शनिवारी रात्री बिबट्याला ठार मारल्यावर त्या बिबट्याचे पायाचे ठसे घेऊन ते चाळीसगाव परिसरात दोन-तीन ठिकाणी आढळलेल्या बिबट्याच्या पायांच्या ठशांशी जुळविण्यात आले. ते ठसे जुळले आहेत. त्यामुळे ९९ टक्के हा नरभक्षक बिबट्याच होता, हे स्पष्ट झाले असल्याचे देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.