चाळीसगाव : वलठाणची घटना, एकाविरुद्ध गुन्हा
चाळीसगाव : तालुक्यातील वलठाण तांड्यात महावितरण कंपनीच्या पथकाकडून थकीत वीज बिल भरण्यासंदर्भात वाहनातून आवाहन करीत असताना एकाने हातात काठी घेऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संतोष गणपत राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता घडली.
महावितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता विनोदकुमार बाविस्कर हे हर्षल महाजन, कल्पेश महाले, राहुल महाजन यांच्या पथकासह २३ रोजी वलठाण येथे गेले होते. त्या वेळी थकीत वीज बिल भरण्याबाबत शासकीय वाहनातून लोकांना आवाहन करीत होते. त्याचवेळी संतोष राठोड याने वाहन अडविले आणि तुमच्याकडे वीज कनेक्शन कट करण्याचा जीआर आहे काय, माझ्या गावात वीज कनेक्शन कट करू नका, नाहीतर तुम्हाला जिवंत जाऊ देणार नाही, असे सांगून हातात काठी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना धमकी व शिवीगाळ केली. विनोदकुमार बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.