४०० उद्योगांची चाके थांबली : प्लॅस्टिक उद्योगांना पोहचली अधिक झळ
जळगाव : शुक्रवारी संध्याकाळी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये १३२ केव्हीच्या मुख्य वाहिनीवर वीज कोसळून वी पुरवठा खंडित झाल्याने उद्योगांची चाके थांबली व ४०० उद्योगांना करोडो रुपयांचा फटका बसला आहे. आठ ते नऊ तास उद्योग बंद राहिल्याने ते पूर्ववत सुरू होईपर्यंत उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी जळगाव शहर व परिसरात अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार वादळ देखील झाले व विजाही कडाडल्या. यादरम्यान, औद्योगिक वसाहत परिसरामध्ये १३२ केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीवर वीज कोसळून सात तास वीज पुरवठा खंडित झाला. मुख्य वीजवाहिनी वरच वीज कोसळल्याने तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या तर मुख्य वाहिनीवर असलेल्या काही उप वाहिन्याही तुटल्या होत्या. यामुळे शहरातील विविध भागासह औद्योगिक वसाहतमध्ये देखील वीज पुरवठा खंडित झाल्याने जवळपास ४०० उद्योग चार ते पाच तास तास बंद होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू होण्यास तीन चे चार तास लागल्याने आठ ते नऊ तास उत्पादन थांबले होते.
दुरुस्तीसाठी इतर ठिकाणचाही वीज पुरवठा बंदवादळामुळे औद्योगिक वसाहत परिसरातील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर ठिकाणचा देखील वीज पुरवठा बंद करावा लागत होता. त्यामुळे जवळपास सर्वच सेक्टरमधील उद्योगांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने बंद होता.
प्लॅस्टिक उद्योग पुन्हा सुरू होण्यास लागतो वेळजळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॅस्टिक उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी वीज कोसळल्यानंतर जे व के सेक्टरमधील अनेक उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला. या भागात प्लॅस्टिक उद्योगांची संख्या अधिक आहे. प्लॅस्टिक उद्योगांमधील मशिनरी एकदा बंद पडली तर ती पुन्हा सुरू होण्यास चार ते पाच तास लागतात. त्यात शुक्रवारी जवळपास चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होता व त्यानंतर तो सुरू झाल्यानंतर देखील पुन्हा उद्योग पूर्ववत सुरू होण्यास चार ते पाच तास गेले. यामुळे उद्योगांना करोडो रुपयांचा फटका बसला असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वादळामुळे वीज पुरवठा खंडित होऊन उद्योग बंद पडले. यामध्ये प्लॅस्टिक उद्योगांची संख्या अधिक होती. वीज पुरवठा खंडित झाल्याने उद्योजकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.- रवींद्र लढ्ढा, उद्योजक
शुक्रवारी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर सेक्टरमधील देखील वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे अनेक उद्योग बंद होते, रात्री ते पूर्ववत सुरू झाले.- रवींद्र फालक, उद्योजक.