लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला असताना, कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा नगरातही दीड दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यात महावितरणचे अधिकारी-कर्मचारी फोन घेत नसल्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला.
महावितरणतर्फे शहरात सध्या पावसाळीपूर्व कामे सुरू असल्याने, दररोज विविध भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यात रविवारच्या अवकाळी पावसामुळे पुन्हा चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. विशेषतः जाणता राजा नगरात रविवारी पहाटेपासून खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल तीस तासांनी सुरळीत झाला. यामुळे नागरिकांना रविवारची रात्र अंधारात काढावी लागली. या भागात तांत्रिक बिघाड सापडत नसल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. मात्र, या भागातील महावितरणचे वायरमन व अभियंते फोन उचलत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जर एखादा अनुचित प्रकार घडला आणि त्या वेळेस महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
इन्फो :
रविवारी पहाटेपासून या भागात वीज नव्हती. यामुळे उकाड्याचा त्रास होऊन, याचा आरोग्यावरही परिणाम झाला. त्यात महावितरणचे कर्मचारी लक्ष देत नसल्याने, वीज गेल्यावर आम्हाला चांगलाच त्रास सहन करावा लागतो.
तुषार कुमावत, रहिवासी
या भागात दोन दिवस वीज नसल्याने खूप त्रास झाला. रविवारी रात्रीही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने रात्र अंधारात काढावी लागली. वीज कधी येणार, याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिकांची यामुळे खूप गैरसोय होते. तरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
निरंजन मोरिया, रहिवासी
रविवारी झालेल्या पावसामुळे मुख्य विजेवरच बिघाड झाला होता. हा बिघाड लवकर सापडत नसल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला. तसेच अनेक ठिकाणी ब्रेकडाउन झाल्यामुळे आमचे कर्मचारी लवकर वीजपुरवठा सुरू करण्याच्या कामात व्यस्त होते. विजेबाबत ग्राहकांचे फोन आल्यावर त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या.
समीर निगडे, कनिष्ठ अभियंता, महावितरण