वीजपुरवठ्याचे वाजले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 08:18 PM2019-07-30T20:18:14+5:302019-07-30T20:18:49+5:30
संबंधितांचे दुर्लक्ष : महिंदळे आणि परिसरातील नागरीक त्रस्त
महिंदळे, ता.भडगाव : महिंदळे व परिसरात भडगाव सबस्टेशन येथून वलवाडी फिडर मधून वीज पुरवठा होतो. परंतु पावसाचे दोन थेंब किंवा वाऱ्याची साधी झुळूक या वीज वाहिन्यांना सहन होत नाही. पाऊस सुरू होताच विज गुल होते व फॉल्ट घोषीत करून तासंतास तर कधी पूर्ण दिवस व रात्र वीज बंद ठेवण्याचा प्रकार येथे व परिसरात सुरू आहे. यामुळे ग्राहक कमालीचे हैराण झाले आहेत. अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन वेळ मारून नेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
परिसरातील शेतशिवारातील विज वाहिन्या अतिशय जिर्ण झाल्या असल्यामुळे व त्यांमध्ये झाडांच्या फांद्या गेल्याने पाऊस सुरू होत नाही तोच फॉल्ट होतो. हा फॉल्ट शोधण्यात पुर्ण दिवस जातो. रात्री जर पाऊस आला तर पुर्ण रात्र अंधारात काढावी लागते. अशातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे डास, मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे झोपही व्यवस्थित होत नाही. वीज तासंतास जात असल्यामुळे ग्राहक कमालीचे हैराण झाले आहेत.
कमी दाबाचा
वीजपुरवठा
भडगाव येथील सबस्टेशन येथून वलवाडी फिडर मधून भडगाव ग्रामीण, वलवाडी, महिंदळे येथे वीज पुरवठा होतो. परंतु या परिसरात कमी दाबाचा विज पुरवठा करण्यात येतो. यामुळे घरगुती उपकरणे हे निकामी होतात .तर कधी जळतातही. घरातील पंखेही फिरत नाहीत.
पावसाळ्यातच नव्हे तर परिसरातील वीज समस्या ही कायमचीच झाली आहे. या वीज समस्येचा यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम होतो.
या गंभीर समस्येकडे मात्र संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते.
वलवाडी फिडरवर भडगाव अर्बन, वलवाडी, व महिंदळे हे शेवटच्या टोकाला असल्यामुळे नेमका फॉल्ट भडगाव अर्बन मध्ये होतो. तेथे कर्मचारी फॉल्ट काढण्यासाठी उपलब्ध होत नाहीत व या परिसरातील पावसाळ्यापूर्वी झाड्यांच्या फांद्याची कटाई झाली नसल्यामुळे व या फिडरवरील वीज तारा व इन्सूलेटर जिर्ण झाल्या असल्यामुळे झाडांच्या फांद्या त्यांमध्ये गेल्यामुळे नेहमी फॉल्ट होतो. आता वडजी येथील सबस्टेशन येथून वीज पुरवठा सुरळीत करत आहोत.
- जी. एस. मोर, कनिष्ठ अभियंता म.रा.वि.म.भडगाव