तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:49+5:302021-06-03T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यतादेखील वर्तवली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. मात्र तिसरी लाट येईल तेव्हा तयारी करण्याऐवजी आतापासूनच या लाटेचा सामना करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्या साठीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यात लहान मुलांचे लसीकरण, तालुका स्तरावर वॉर रूम, मोठ्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा यावर चर्चा करण्यात आली. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नये, यासाठी आतापासूनच जिल्हा प्रशासन तयारी करत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात तालुका स्तरावर वॉर रूमची स्थापना केली जाणार आहे. १५ जूनपासूनचा या वॉर रूमला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
लहान मुलांसाठी आणखी दहा व्हेंटिलेटर येणार
जिल्ह्यात लहान मुलांसाठी या आधी दहा नवे व्हेंटिलेटर आले आहेत. आता पुन्हा जिल्ह्यात दहा नवे लहान मुलांसाठीचे व्हेंटिलेटर येणार आहेत. तसेच लहान मुलांच्या नियमित लसीकरणाचा आढावादेखील यावेळी घेण्यात आला. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती मुळातच चांगली असते. त्यामुळे त्यांना फारसा त्रास होऊ नये, यासाठी त्यांचे इतर नियमित लसींचे डोस त्यांना वेळेवर दिले जावे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
मोहाडी आणि चोपडा रुग्णालयात नव्या ऑक्सिजन टँकचा प्रस्ताव
जिल्ह्यात सध्या ११७ मेट्रिक टन एवढ्या ऑक्सिजनचा साठा केला जाऊ शकतो. आता मोहाडी महिला रुग्णालय आणि चोपडा ग्रामीण रुग्णालयात नव्या लिक्विड ऑक्सिजन टँक तयार केला जाणार आहे. त्यासाठीचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे दोन नवे टँक तयार झाल्यात जिल्ह्यात १५१ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा केला जाऊ शकतो. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांवर फार अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजन टँक, ड्युरा व जम्बो सिलिंडर यांचेदेखील नियोजन केले जात आहेत.
आरटीपीसीआर चाचण्या वाढवणार
सध्या रुग्ण कमी असल्याने आरटीपीसीआर चाचण्यांवर भर दिला जात आहे. सध्या शासनाने ४० टक्के आरटीपीसीआर आणि ६० टक्के अँटिजन करण्याचे निर्देश आहेत. सध्या जिल्ह्यात ३५ टक्के आरटीपीसीआर आणि ६५ टक्के अँटिजन चाचण्या केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात हे प्रमाण येत्या महिनाभरात पूर्ण होईल.