लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या सहा दिवसांपासून भाववाढ व स्थिरता असलेल्या सोने-चांदीच्या भावात शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी घसरण झाली. यात चांदीच्या भावात एक हजाराने घसरण होऊन ती ७० हजार रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ४७ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले. विशेष म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात घसरण होत असताना सुवर्णबाजारातही घसरण पहायला मिळाली.
गेल्या सहा दिवसांपासून सुवर्ण बाजारात भाववाढ राहिली. यात सोमवारी आठवड्याची सुरुवातदेखील भाववाढीने झाली. मंगळवारी एक दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर बुधवारी चांदीत ५०० रुपयांची वाढ होऊन ती ७१ हजारावर पोहचली. तर सोन्यात १०० रुपयांची वाढ होऊन ते ४७ हजार ६०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर गुरुवारी भाव स्थिर राहिले. मात्र शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी चांदीच्या भावात एक हजाराने घसरण होऊन ती ७० हजार रुपये प्रति किलोवर आली. तर सोन्याच्याही भावात ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ४७ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
एरव्ही शेअर बाजारात घसरण झाल्यास सोने-चांदीचे भाव वाढतात. मात्र शुक्रवारी शेअर बाजारात घसरण होत असताना सोने-चांदीचेही भाव कमी झाले, हे विशेष. मुळात सध्या लग्नसराई जास्त नसल्याने सोने-चांदीला मागणीही कमी असून त्यामुळे भाव कमीच राहत आहे. मात्र अचानक सट्टाबाजारातील खरेदी-विक्रीमुळे भावात चढ-उतार होत असल्याचे सांगितले जात आहे.