समाजात उद्भवणाऱ्या प्रश्नांची वैज्ञानिक चिकित्सा होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:21+5:302021-06-01T04:13:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्राला प्रबोधनात्मक चळवळीची मोठी परंपरा असून, परिर्वतनाशिवाय स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे समाजात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्राला प्रबोधनात्मक चळवळीची मोठी परंपरा असून, परिर्वतनाशिवाय स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे समाजात वेळावेळी उद्भवणाऱ्या प्रश्नांची वैज्ञानिक चिकित्सा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कर्मवीर व्यंकटराव रणधीर ऑनलाइन व्याख्यानमालेत समाजप्रबोधन या विषयावर व्याख्यान झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, झेड. बी. पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सुधीर पाटील, रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे उपस्थित होते.
वैचारिक प्रबोधनाशिवाय पर्याय नाही
डॉ. साळुंके म्हणाले की, आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थाला सारखेच महत्त्व दिले गेले असले तरी काळाच्या ओघात फक्त आणि फक्त अर्थकारणाला महत्त्व दिले गेले. वैचारिक प्रबोधनाशिवाय पर्याय नाही. वैज्ञानिक चिकित्सा केल्याशिवाय सत्यशोधन होणार नाही. सद्य:स्थितीत प्रबोधनासाठी समाजिक परिषदांचे आयोजन, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार, समाज उत्थानासाठी राखीव जागा हे पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. कोविडच्या या परिस्थितीत समाजप्रबोधन अधिक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन रासेयो मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रशांत कसबे यांनी केले. रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योगीता पाटील यांनी आभार मानले.