प्रा.वा.ना. आंधळे यांच्या कवितेचा वेध : ‘फर्मान आणि इतर कविता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:22 PM2018-07-09T16:22:49+5:302018-07-09T16:24:14+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात ज्येष्ठ कवी, गझलकार प्रा.वा.ना. आंधळे यांच्या ‘फर्मान आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहावर आधारित समीक्षात्मक ग्रंथाचा रवींद्र मोराणकर यांनी थोडक्यात करून दिलेला परिचय.
जगाच्या नकाशावर समाजहिताचा अजेंडा नेणारी ‘आई’! मला जन्म घेऊ दे ! ही अभियान कविता ज्यांनी लिहिली त्या सुप्रसिद्ध गझलकार प्रा.वा.ना. आंधळे यांंच्या ‘फर्मान आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहावर आधारित नुकताच समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालाय.
अथर्व पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या ‘फर्मान आणि इतर कविता आशय आणि आस्वाद’ या समीक्षा ग्रंथाचे संपादन डॉ.तुषार चांदवडकर यांनी केले आहे.
या ग्रंथात महाराष्टÑातील व महाराष्टÑाबाहेरील ४० नामवंत समीक्षक अभ्यासकांनी प्रा.आंधळे यांच्या कवितेचा वेध घेत लेखन केले आहे.
सर्व मान्यवर समीक्षाकांचा उल्लेख करणे शक्य नसले तरी, डॉ.श्रीपाल सबनीस, डॉ.अश्विनी धोंगडे, डॉ.सतीश बडवे, डॉ. मनोहर जाधव, डॉ.केशव मेश्राम, डॉ.एकनाथ पगार, डॉ.मृणालिनी कामत, डॉ.श.रा.राणे, डॉ.फुला बागुल, वि.दा.पिंगळे, प्रा.डॉ.सुरेश भिलकोटकर या लेखकांच्या नामोल्लेखावरून ग्रंथाचे सौंदर्य वाचकांच्या अंतरी निश्चितच जाईल.
प्रा. आंधळे यांची गझल ही आत्मसंवादी व लोकसंवादी कशी आहे, याचे मर्म उलगडत या गझलेने सामाजिक विषमतेचा निषेध कसा नोंदवलाय याचा सुंदर वेध या ग्रंथातून समीक्षकांनी घेतलेला दिसून येईल.
काव्यनिष्ठा आणि प्रबोधनात्मक जाणिवा याची सुंदर वीण देणाऱ्या या गझलकाराला खान्देशातील संपन्न कवी परंपरा असलेल्या कवीकुळातील श्रेष्ठ कवी संबोधून फर्मानरूपी असलेलं हे काव्य गोंदण खान्देशी काव्याचे सौभाग्य लेणं आहे, या शब्दात समीक्षा लेखकांनी प्रा. आंधळे यांच्या काव्यलेखनाचे मनस्वी कौतुक केलेय.
एखाद्या काव्यसंग्रहाची एकंदर समीक्षा काव्य जाणीव कशी समृद्ध करते याचा वस्तुपाठ म्हणजे ‘आशय आणि आस्वाद’ हा समीक्षा ग्रंथ होय, असे अभ्यासपूर्ण भाष्य मराठीचे अभ्यासक प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे ग्रंथाच्या मलपृष्ठावर करतात.
संपादक डॉ. तुषार चांदवडकर, प्रकाशक : अथर्व पब्लिकेशन्स, पृष्ठे : २७८, मूल्य ३५० रुपये.