अमृत व भुयारी गटारींच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची आधीच दुरवस्था झाली असतांना, आता महानेटच्या कामामुळे अधिकच दुरवस्था होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चार दिवसांपूर्वी नगरसेविका जयश्री महाजन यांची दुचाकी घसरून त्यांचा हात मोडला गेला. दररोज शहरात कुठे ना कुठे खड्डयांमुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. असे असतांना मनपा प्रशासनाने महानेटच्या कामाला परवानगी दिल्यामुळे नागरिकांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ज्या भागात कुठलेही शासकीय कार्यालये नाहीत,अशा ठिकाणींही हे काम सुरू असल्यामुळे या व्यावसायिक कामाबद्दल नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे तक्रारी करुनही कारवाई करण्यात आलेली नाही.
तर `महानेट`चे शहरात काम बंदच :
शहरात एकीकडे वेगाने महानेटच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असतांना, दुसरीकडे शहर अभियंता अरविंद भोसले यांनी दोन महिन्यांपासून महानेटचे काम बंद असल्याचा दावा केला आहे. या कंपनीने खोदकामाची परवानगी घेतली होती. मात्र, शहरात खोदकाम कुठल्या भागात करायचे, याचा आराखडा मनपाकडे सादर न करता, कामाला सुरूवात केली होती. या प्रकारामुळे त्यांना नोटीस बजावल्याने दोन महिन्यांपासून महानेटचे काम बंद असल्याचे भोसले यांनी सांगितले.
पुरावा द्या, कारवाई करतो :
शहरात दोन महिन्यांपासून महानेटचे काम बंद असतांना काही जणांकडून काम सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. मात्र, कुठे काम सुरू आहे, त्याचा कोणीही पुरावा दिला नाही. कुठे काम सुरू आहे ते दाखवा, फोटो काढुन पुरावा द्या, तात्काळ कारवाई करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. तसेच हे काम शासकीय असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही शुल्क न आकारण्याबाबत आले असल्याचेही भोसले यांनी सांगितले.