लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ५० वर्षांवरील महिला आणि पुरुष होमगार्ड जवानांना कोरोनाची बाधा होऊ शकते, असा अंदाज बांधून त्यांना बंदोबस्ताचे काम देऊ नये असे आदेश राज्याच्या होमगार्ड महासमादेशकांनी काढले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्ववत बंदोबस्ताचे काम मिळावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. या संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
गेल्यावर्षी ५० पेक्षा जास्त वय असलेल्या महिला आणि पुरुष होमगार्ड जवानांची शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत अनेक जवानांची यश संपादन केले आहे. त्यामुळे वय जास्त आहे म्हणून त्यांना कामापासून दूर ठेवणे हे अन्यायकारक आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक शहराध्यक्ष नीलेश बोरा, संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे ॲड. अभिजित रंधे, मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख हे सहभागी झाले.