टंचाई निवारणार्थ दोन कोटींच्यावर तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:15 AM2021-04-05T04:15:27+5:302021-04-05T04:15:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यावर सलग दुसऱ्या वर्षी वरूणराजाची कृपा राहिल्याने संभाव्य पाणी टंचाई आराखड्यातील उपाययोजनांवरील खर्चात कपात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यावर सलग दुसऱ्या वर्षी वरूणराजाची कृपा राहिल्याने संभाव्य पाणी टंचाई आराखड्यातील उपाययोजनांवरील खर्चात कपात होऊ शकली. त्यामुळे यंदाचा टंचाई आराखडा दोन कोटी तीन लाख १८ हजार रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र या खर्चात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अवघ्या १३ लाख ९० हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. पाऊस उत्तम झाल्याने आराखडा कमी रकमेचा तयार होत आहे.
जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस होऊन पावसाने सरासरी ओलांडली. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली होती. त्यामुळे नद्या, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नद्या, तलावांना पाणी असल्याने टंचाई आराखड्यातील तरतूद घटू शकली.
४१७ योजनांद्वारे टंचाई निवारण
जिल्ह्यात विहिरी, कूपनलिका, प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, विहिरी खोलीकरण, अशा १५ तालुक्यांमध्ये एकूण ४१७ योजनांद्वारे दोन कोटी तीन लाख १८ हजार रुपये खर्च करून टंचाई निवारण केले जाणार आहे.
सर्वाधिक योजना अमळनेर तालुक्यात
टंचाई निवारणासाठी सर्वाधिक योजना अमळनेर तालुक्यात राबविल्या जाणार आहेत. येथे ४० लाख वीस हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पारोळा तालुक्यात ७८ योजनांद्वारे ३० लाख ७० हजार, तर धरणगाव तालुक्यात ६८ योजनांद्वारे ३१ लाख २० हजार रुपये खर्च करून टंचाई निवारणार्थ उपाययोजना केल्या जाणार आहेत.
गतवर्षी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा हा १३ लाख ९० हजारांचा होता, तर २०१९ मध्ये हाच आराखडा ३६ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जिल्ह्यात उत्तम पाऊस झाल्याने आराखड्यातील तरतुदींचा खर्च कमी होऊ शकला.
तालुकानिहाय योजनांची संख्या व खर्च (खर्च लाखामध्ये)
तालुका--- योजना संख्या--- खर्च
अमळनेर--- ८०---४०.२०
भडगाव---८---१.९२
भुसावळ---४---११.०८
बोदवड---१५---७.७६
चाळीसगाव ---४५---१९.८०
चोपडा ---२४---१३.१२
धरणगाव---६८---३१.२०
एरंडोल---७---२.५२
जळगाव---१७---९.२८
जामनेर---१६---५.७६
मुक्ताईनगर ---१७---९.२०
पाचोरा ---२५---११.४०
पारोळा ---७८---३०.७०
रावेर ---५---२.९२
यावल---८---६.३२