पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या आर्मच्या भुसंपादनासाठी दीड कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:07+5:302021-02-17T04:21:07+5:30
महासभेत ठेवणार प्रस्ताव : ४०० स्क्वेअर मीटरची जागा मनपा घेणार ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील पिंप्राळा रेल्वे ...
महासभेत ठेवणार प्रस्ताव : ४०० स्क्वेअर मीटरची जागा मनपा घेणार ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असतानाही केवळ भोईटे नगराकडून येणाऱ्या रस्त्यालगत पुलाला आर्म तयार करण्याच्या मागणीसाठी या पुलाचे काम अजूनही सुरु होऊ शकलेले नाही. आर्मला आता मंजुरी मिळाली असून, आर्ममुळे बाधित होणाऱ्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याचे काम मनपाकडून पूर्ण करण्यात आले आहे. आर्ममुळे ४०० स्क्वेअर मीटर जागा बाधित होणार असून ही जागा भूसंपादित करण्यासाठी मनपाने दीड कोटींची तरतूद केली आहे. तसेच हा प्रस्ताव येत्या महासभेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांपूर्वी पिंप्राळा रेल्वेगेटवर उड्डाणपूल मंजूर झाला आहे. मात्र, या पुलाचे काम अद्यापही सुरू होऊ शकलेले नाही. दोन वर्षांपूर्वी या कामाला मंजुरी मिळाली असून, महारेलकडून हे काम केले जाणार आहे. पुलासाठीची पूर्ण तयारी महारेलकडून करण्यात आली आहे. मात्र, केवळ आर्मसाठीच्या मंजुरी आणि भूसंपादनाच्या कामासाठी पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, महारेलचे महाराष्ट्र राज्याचे संचालक विकास दत्ता यांनी मनपाला महिनाभरात भूसंपादनाचे काम पूर्ण बाधित मालमत्ताधारकांना निर्धारित नुकसानभरपाई देऊन ही जागा ताब्यात घेण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, मालमत्तांचे मूल्यांकन करण्यातच मनपाने १५ दिवस लावले. आता येत्या महासभेत हा प्रस्ताव ठेवून जागा ताब्यात घेण्यात येणार आहे.
लवकरच कामाचा शुभारंभ
महारेलने पिंप्राळा उड्डाणपुलाचे नवीन डिझाईन आर्मसह तयार केले असून, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. कानळदा रस्त्यांकडील दांडेकर नगर भागातील एस.के.ऑईल मिलच्या रस्त्यापासून सुरत व मुंबई रेल्वे लाईनवरून थेट रिंगरोडवर हा प्रस्तावित उड्डाणपूल उतरणार आहे. यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र, या कामासाठी आता मनपा व रेल्वेनेही तत्परता दाखविण्याची गरज आहे.