पहूरला शेंदूर्णींहून व वाकोदला तोंडापूर येथून तात्पुरता विज पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:35 PM2019-06-25T18:35:04+5:302019-06-25T18:35:39+5:30
पहूर उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफार्मर जळल्याने पहूरसह वाकोद परीसरातील गावे २० तासांपासून अंधारात
पहूर ता जामनेर : येथील १३२ के.व्ही उपकेंद्रातील मुख्य पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्याचे मंगळवारी घेण्यात आलेल्या तांत्रिक चाचणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपासून मंगळवार दुपारनंतर पहूरफिडर व वाकोद फिडर अंतर्गत असलेली अनेक गाव वीस तासांपासून अंधारात होती. यामुळे शेंदूर्णीं व नाचखेडा येथून पहूर फिडरचा तसेच तोंडापूर येथून वाकोद फिडरचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून मुख्य ट्रान्सफार्मर कार्यान्वित होईपर्यंत पहूर वाकोद फिडरवर भारनियमन करण्यात येणार आहे.
पारेषण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांसह चाळीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत ट्रान्सफार्मर सुरु करण्यासाठी शतीर्चे प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. नवीन ट्रान्सफार्मर येईपर्यंत जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मंगळवार दुपारपासून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपविभागाचे कार्यकारी उप अभियंता विद्याधर सोनवणे यांच्या सह पथकाने प्रयत्न केले.
विजेचा जपून वापर करण्याचे आवाहन
अतिरिक्त विजेचा भार वाढल्याने आवश्यकतेनुसार वाकोद व पहूर फिडर अंतर्गत असलेल्या गावांमध्ये भारनियमन करण्यात येणार आहे. त्यामुळे विजेचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
क्रुषी पंपाचा विजपूरवठा बंद
मुख्य रोहित्र जळाल्याने वाकोद व पहूर फिडरवरील गावांमध्ये विजपुरवठा कमी अधिक प्रमाणात राहणार असून तात्पुरत्या जोडलेल्या विज पुरवठ्याची क्षमता कमी असल्याने गावात वीज पुरवठा सुरळीत असणार आहे. पण कृषी पंपांचा वीज पुरवठा मुख्य रोहित्र कार्यान्वित होईपर्यंत खंडित राहणार आहे.