रेल्वे प्रशासनाला पडला स्टेशन रोडचा विसर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:13 AM2021-07-15T04:13:52+5:302021-07-15T04:13:52+5:30
वासेफ पटेल भुसावळ : ‘स्वच्छतेसह रेल्वे परिसरामध्ये प्रत्येक बाबीची सोय आहे,’ असे रेल्वे प्रशासन दावा करते, मात्र ज्या रेल्वे ...
वासेफ पटेल
भुसावळ : ‘स्वच्छतेसह रेल्वे परिसरामध्ये प्रत्येक बाबीची सोय आहे,’ असे रेल्वे प्रशासन दावा करते, मात्र ज्या रेल्वे जंक्शनवर देशातील कानाकोपऱ्यातील नागरिक भुसावळ शहरात जोडले जातात व येथे येण्यासाठी स्टेशन रोडचा वापर करतात अशा अवघ्या ५०० मीटरच्या रस्त्याला रेल्वे प्रशासनाला विसर पडला असून, 'रस्ता आमचा मात्र वापर नसल्याने आम्ही तो करणार नाही, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.
‘भारतीय रेल्वेचा आत्मा मध्य रेल्वे व मध्य रेल्वेचा आत्मा भुसावळ विभाग’ अशी भुसावळ रेल्वे भागाची ओळख आहे. देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रवासासाठी सोयीचे रेल्वेस्थानक. भुसावळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रशस्त वाहनतळ, उद्यान. मात्र स्टेशनच्या बाहेर पाय टाकताच रेल्वे स्थानक रस्त्याची संपूर्ण वाताहत झालेली आहे. ही स्थिती आहे रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असलेल्या अमर स्टोअर्स ते रेल्वेस्थानक मुख्य रस्त्याची. या रस्त्यावर अक्षरशः दीड ते दोन फुटांचे मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. मात्र ‘रस्ता आमचा जरी असला तरी यावर वापर’ आमचा नसून भुसावळकरांचा आहे. यामुळे आम्ही तो रस्ता करणार नाही, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने या रस्त्याच्या बाबतीत घेतली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांचा जास्त वापर
या मुख्य रस्त्यावरून दिवसाला जवळपास ३० ते ४० हजार नागरिक दररोज वापर करत असतात. यात रेल्वे गार्ड लाईन, पंधरा बंगला परिसर, रेल्वे डेपो यासह रेल्वेच्या अनेक भागांना हा रस्ता जोडतो. याशिवाय शहरातील नागरिकही या रस्त्यावरून वापर करतात. मात्र रेल्वे प्रशासन या रस्त्याकडे पाहण्याचीही तसदी घेताना दिसून येत नाही. येता-जाता खड्डेमय रस्त्यातून रेल्वे कर्मचाऱ्यांना जावे लागते. यामुळे अनेकांना पाठीचे आजार जडले आहेत. मात्र आमचे रेल्वेचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने आमच्यावर ही व्याधीने ग्रस्त झाल्याची वेळ आल्याचे रेल्वे कर्मचारी उघडपणे आता बोलताना दिसून येत आहेत.
बसस्थानकही याच मार्गावर
रेल्वे स्थानकाच्या बाजूला लागूनच भुसावळचे बसस्थानकसुद्धा आहे. राज्य अंतर्गत भुसावळला येणारे प्रत्येक प्रवासी या ठिकाणी उतरतात. रेल्वे व बसमधून येणारे प्रवासीही स्थानकाच्या बाहेर पाय टाकताच, ‘अहो, हे काय भुसावळचे रस्ते’ असे सहज बोलत असतात. ‘कुठे गेले येथील रेल्वे किंवा पालिका प्रशासन?’, असे ते सहज बोलत असतात. त्यामुळे भुसावळकरांना मान खाली घालावी लागते.
रेल्वेचे म्युझियमही याच मार्गावर
तत्कालीन डीआरएम आर. के. यादव असताना त्यांनी बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या याच मार्गावर रेल्वेचे म्युझियम अगदी काही दिवसात बनविले होते व त्याच वेळेस त्यांनी या मार्गाची दुरुस्तीदेखील केली होती. तसेच रेल्वेच्या हद्दीमध्ये हा मार्ग असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी रस्त्यावर लोखंडी अँगल लावून रेल्वे मालकी असल्याने रस्त्याची साईजदेखील कमी केली होती. सगळे अधिकार रेल्वे या मार्गावर करत करताना दिसत येत आहे. मात्र रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आमचा वापरच नसल्याचे अफलातून उत्तर रेल्वे प्रशासनाकडून दिले जात आहे. म्युझियमसाठी रेल्वे वेगळा मार्ग जाणार काय? असा हास्यास्पद प्रश्न रेल्वे कर्मचाऱ्यांसह नागरिक करताना दिसून येत आहेत.
याच मार्गावर होणार रेल्वेचे व्यापारी संकुल
याच स्टेशन मार्गावर रेल्वेच्या नियोजित व्यापारी संकुलासाठी मोठी जागा आहे. याचीही प्रशासकीय प्रक्रिया नंतर येथे मोठा व्यापारी संकुल बनविण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे काही नवीन मार्ग करणार का? की याच मार्गाचा वापर करणार? असेही लोक आता बोलताना दिसून येत आहेत.
रस्ते न झाल्याने अखेर खड्ड्यांना मुरुमाचा मुलामा
रेल्वे परिसर हद्दीमध्ये अपडेट काम करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने अमर रोड ते रेल्वे स्थानकापर्यंत स्टेशन रोडवर प्रचंड प्रमाणात झालेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाठीचे व्याधी जडले आहे. अखेर पालिका प्रशासनाने पुढाकार घेत प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी यांनी खड्डेमय रस्त्याला मुरमाचा मुलामा दिल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाचा या मार्गावर वापर कमी असल्यामुळे रेल्वे हा मार्ग दुरुस्त करणार नाही. नगरपालिका प्रशासन करत असले तर रेल्वे प्रशासनातर्फे ना हरकत त्यांना दिले जाईल. तसे या बाबतीत मुख्याधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. मात्र रेल्वे हा मार्ग दुरुस्त करणार नाही.
-एम. एल. गुप्ता, मंडल अभियंता, विशेष कार्य, मध्य रेल्वे, भुसावळ
रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी या रस्त्याची देखभाल दुरुस्ती, मालकी हक्क हे पालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करावे. अवघ्या काही दिवसातच हा रस्ता चकचकीत होईल. याच मार्गावर रेल्वे प्रशासनाचे म्युझियम व नियोजित कोट्यवधींचे व्यापारी संकुल होणार आहे, हेसुद्धा रेल्वे प्रशासनाने गृहीत धरावे.
-संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी, नगरपालिका, भुसावळ