पावसाळा आणि हिवाळा माङो आवडते रूतू. ‘पाऊस’ असा शब्द जरी उच्चारला तरी तो मन चिंबचिंब करून जातो. भाव तरल व्हायला लागतात. हिरदाची हिरवाई बहरत जाते. अन् सारं भावविश्व ओलं चिंब होऊन जातं. बालपणीचा पाऊस मित्र-मैत्रिणींसारखा, आनंददायी खेळकर, खोडकर, लपाछपी खेळणारा, वाकुल्या दाखवणारा, गट्टी-पू करणारा. निष्पाप बालकासारखा लगेच हसणारा, कधी रुसणारा. यौवनातला पाऊस प्रेयसीसारखा आतूर होणारा, आतुरता वाढविणारा, सदा समर्पित तर कधी हट्टी, हेकेखोर, वचनबद्ध तर कधी फसवा, चकवा देणारा, विरह देणारा. पापणीत साचणारा..हिरदात अंकुरणारा..! अन् वृद्धापकाळी? तोही अडगळ अन् वृद्धत्वही अडगळ.. निकडीचा असूनही नकोसा झालेला.. जगणं बहाल करणारा असल्यावरही..? असो. आज कागद आभाळ झालंय.. शब्दांच्या विजा चकाकताहेत. विचारांचे वादळ उठलंय. भावविश्व कोलमडायला होतेय. हिरदात मेघ दाटताहेत. लेखणीतून हळूवारपणे वाहताहेत अन् पाऊसधारा कोसळताहेत.. शब्द थेंबांनी मृदगंध पसरलाय.. हृदयाच्या आसमंतात धुकं दाटलंय शंकांचं, भीतीचं. असं की. सारं वाहून तर नेणार नाही ना, असा हा पाऊस-कधी, कुठे बहर आणतो तर कधी सारं आयुष्य वाहून नेतो. कधी जीवन देतो तर कधी मरण.! असा हा बहुरुपी पाऊस. आनंददायी पाऊस. अवखळ पाऊस.. फसवा पाऊस. खटय़ाळ पाऊस. चकवा देणारा पाऊस. अन् सावलीचा खेळ खेळता मध्येच राज्य देणारा, तर कधी डाव जिंकणारा पाऊस. असे अनेक पाऊस आपण अनुभवतो. आपल्या मनात साठवतो. पहिला पाऊस, मनीचा सुगंध घेऊन येणारा पाऊस, बालपणीची गढूळ पाण्याची डबकी, त्यात फटकन मारलेल्या उडय़ा, तो चिखल हातात थपथप करताना वाटणारी मजा, चिखलाचा भरतो म्हणून आईने दिलेली सजा, सारं हवंहवंसं.. पावसाचं झोडपणं अन् आईचं बदडणं सारखंच गोड. विजांचा ढोल अन् ढगांची गाणी, पावसाचे बालगीत गाणा:या अवखळ सरी नाचत बागडत बालकांसवे बालकच होतात. अन् बालकच होतात मग पाऊस..! असेच अनेकदा मी स्वत: पाऊस झाले. पावसाचे दिवस असल्याने थोडय़ा थोडय़ा वेळानंतर थंडवारा, शीतल धारांचा अभिषेक होत रहायचा. पावसात भिजणं, खेळणं, खेळता-खेळताच कोरडं होणं, पुन्हा भिजणं, अशा ओल्या कोरडय़ाच्या भीजपावसाची मजा मनसोक्त लुटली. 1977-78 चे वर्ष असावं. एवढय़ा वर्षापूर्वीचा रानपाऊस जसाच्या तसा मन:पटलावर कोरला गेलाय. असा हा संस्मरणीय पाऊस. न्याराच पाऊस. नद्या ओहोळातून खळखळणारा, आभाळातून येणारा अन् हृदयात भरलेला पाऊस.. आज अंकुरला. कोवळाकच्च. माङया बालपणासारखाच..!
पाऊस अंकुरलाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 4:29 PM