साकडे पंढरीत... पाऊस चाळीसगावात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 04:55 PM2019-07-03T16:55:29+5:302019-07-03T16:57:33+5:30
चाळीसगावहून अलंकापुरी पंढरपुरात दाखल झालेल्या २२०० भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाला पावसाचे साकडे घातले अन् पावसाने चाळीसगाव परिसरावर गेल्या तीन दिवसांपासून भीज पावसाची छत्र धरली आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावहून अलंकापुरी पंढरपुरात दाखल झालेल्या २२०० भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाला पावसाचे साकडे घातले अन् पावसाने चाळीसगाव परिसरावर गेल्या तीन दिवसांपासून भीज पावसाची छत्र धरली आहे. पांडुरंगाने आमची करुणा ऐकली. अशा आनंदी प्रतिक्रिया या भाविकांनी मंगळवारी पहाटे चाळीसगावी आल्यानंतर व्यक्त केल्या.
समाधानकारक पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. या सर्व २२०० भाविकांनी सोमवारी सकाळी हरिनामाच्या गजरात लक्झरी बसेस आणि चारचाकी गाड्यांमधून पंढरपूरकडे कुच केली होती. युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चातून ‘चला भेटूया विठुरायाला’ वारीचे आयोजन केले होते.
दरम्यान, मंगळवारी पंढरपूरहून परतलेल्या भाविकांनी आपल्या आप्तांना प्रेमालिंगन देऊन वारीची सांगता केली.
रविवारी २२०० भाविकांना ओळखपत्रे देण्यात आली. यात आबालवृद्धांसह तरुणांचाही सहभाग होता. सकाळी सीताराम पहेलवान यांच्या मळ्यात हरिनामाचा गजर करीत भाविकांनी शोभायात्रा काढली. भक्तीगीत गायनाचा कार्यक्रमानंतर हे सर्व भाविक पंढरपूरकडे रवाना झाले. वाटेत त्यांच्या मुक्कामासह जेवण व नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
सोमवारी विठूरायाचे दर्शन झाल्यानंतर भाविकांनी परतीच्या वाटेवर प्रस्थान केले. मंगळवारी पहाटे सिग्नल चौकात भाविकांचे आगमन झाल्यानंतर ‘ज्ञानोबा - तुकाराम’ अशा जयघोष करण्यात आला. मंगेश चव्हाण यांनी सहपत्नीक भाविकांचे स्वागत केले.