समाजासाठी काही तरी करायचं याची जाण लहानपणीच- रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 01:05 AM2020-03-08T01:05:34+5:302020-03-08T01:07:13+5:30

‘मी स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मला माझ्या समाजासाठी काही करायचे आहे, याचा शोध, नीलिमा मिश्रा यांना खूप लवकर लागला.

Ramon Magsaysay Award Nilima Mishra - A Childhood Reality | समाजासाठी काही तरी करायचं याची जाण लहानपणीच- रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा

समाजासाठी काही तरी करायचं याची जाण लहानपणीच- रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा

googlenewsNext
ठळक मुद्देगोड बोलण्याच्या संवादातून बचत गट उद्योगाला फायदामहिलांच्या आधार ठरल्या नीलिमा दीदी

रावसाहेब भोसले
पारोळा, जि.जळगाव : ‘मी स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मला माझ्या समाजासाठी काही करायचे आहे, याचा शोध, नीलिमा मिश्रा यांना खूप लवकर लागला. त्यातूनच वयाच्या तेराव्या वर्षीच लग्न न करण्याचा आणि समाजासाठी पुढचे आयुष्य झोकून द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर या गावी झाला.
धुळ्यातील जयहिंद महाविद्यालयात मानसशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयात एम.ए. ही पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी १९९५ ते २००३ या काळात डॉ.एस.एस. कलबाग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुणे जिल्ह्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रमात काम केले. तेथे त्यांनी
अनेक जबाबदाऱ्या पार पाडतानाच तरुणांसाठी आणि स्त्रियांसाठी कार्य केले. बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण विकास साधता येतो हे लक्षात घेऊन त्यांनी २००० मध्ये स्त्री सक्षमीकरणासाठी ‘भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन’ची स्थापना केली, तर २००८ मध्ये ‘भगिनी निवेदिता फाऊंडेशन’ची स्थापना केली. या दोन्ही संस्थांचे कार्य उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये चालते. प्रथम बहादरपूर येथे महिलांचा बचतगट त्यांनी तयार केला. तेथे तयार केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून गोधडी बनवण्यास सुरुवात केली. बहादरपूरची ‘गोधडी’ विदेशात लोकप्रिय झाली आहे. नीलिमा यांनी पूर्व खान्देश व पश्चिम खान्देशात बचत गटाचे जाळे तयार करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांनी ऊसतोडणी कामगारांच्या सावकाराकडे गहाण असलेल्या जमिनी सोडवून दिल्या. त्यांच्या या कार्याचा गौरव प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्काराने करण्यात आला. त्याचप्रमाणे २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
आज ग्रामीण भागातील शेतकरी व स्त्रियांच्या रोजगाराचे काम मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे उभे राहिले आहे. आतापर्यंतच्या प्रवासातील अनुभवातून या कामाची वाटचाल सुरू आहे. प्रगतीचा एक एक टप्पा गाठला जातोय.
गेल्या १७ वर्षांपासून बहादरपूर या जन्मगावी आमचे काम उभे राहिले. ही कामे करताना जो आनंद आणि समाधान मिळते त्याचे वर्णन शब्दात करण्याजोगे नाही. याच गावातून प्रेरणा घेऊन या कामाचे स्वप्न बघितले.
गावात काम करण्याआधी घेतलेले प्रशिक्षण, अनुभव, गुरूंकडून मिळालेले मार्गदर्शन याची सविस्तर मांडणी आणि गावात कामाची सुरुवात, टप्प्याटप्प्याने मिळालेला लोकसहभाग त्यानंतर स्त्रियांमध्ये निर्माण झालेली उद्योजकता, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी भागात सौरदिवे पोहोचविले.
‘मला जाणवले की, मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. मला गावातील लोकांच्या परिस्थितीविषयी जाणीव होऊ लागली. ग्रामीण भागात असल्यामुळे अनेक गोष्टींच्या उणिवा, मर्यादा जाणवत गेल्या आणि त्यातूनच काही तरी करायचा दृढनिश्चय झाला व नंतर त्याचे ध्येयात रूपांतर झाले. या ध्येयाची धुंदी अशी होती की, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी करताना ते स्वप्न जगायला मी सुरुवात केली. भांडी धुताना, गुरांचे शेण आवरताना, शेणाच्या गवºया करताना, गाईच्या धारा काढताना, शाळेत जाताना भविष्यात काय करणार, काय करावे लागेल याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. कल्पना मांडणे सुरू झाले आणि त्यानुसार आराखडे आखणे सुरू झाले.
समाज व देशाप्रति आपल्या असलेल्या कर्तव्याबद्दलचे गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळत होते. कोणाला सांगावे, सांगितले तर हसतील किंवा वेडे म्हणतील म्हणून परमेश्वराशीच संवाद साधत गेले. आपण कसे राहतो आहे, कसे दिसतोय, चप्पल घातली की नाही, कपडे टापटीप आहेत का या गोष्टींकडे माझे कधी लक्षही गेले नाही, पण आपण जे स्वप्न बघितले आहे त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी काय करायला पाहिजे, याचेच विचार सुरू झाले. आणि आपले सारे आयुष्य गावात राहून गावासाठीच घालवायचे हेही ठरले. मात्र यासाठी अभ्यास, अनुभव या गोष्टींची गरज होतीच.
त्यासाठी पुढील शिक्षण हे पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात घेण्याचे ठरले. स्वप्न बघण्याचे व स्वप्नपूर्तीसाठी नियोजन करण्याचे धाडस हे केवळ माझ्या वडिलांमुळे शक्य झाले. कारण त्यांच्याबद्दल मला हा विश्वास होता की ते कधीच नाही म्हणणार नाहीत. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वास त्यांनी महत्त्व दिले आणि म्हणूनच स्वप्न बघताना जेवढे मोठे आणि दूरपर्यंतचे बघू शकत होते त्यात कुठेही अडथळा येईल असे वाटले नाही. पुढे पुणे विद्यापीठात शिकायला गेल्यावर तिथल्या मैत्रिणींना आपण पुण्यात का आलो आहे, भविष्यात काय करायचे आहे ही माहिती देत गेले. त्या वेळी काही जणी मला दिशाही दाखवू लागल्या. त्याच काळात लातूर येथे भूकंप झाला होता. तेथे काम करण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची गरज आहे, असे पोस्टर्स ठिकठिकाणी लावलेली असत. माझ्या मैत्रिणी मला सुचवायच्या की, तुला समाजकार्य करायचे आहे, मग तू या कार्यात सामील का होत नाहीस? मला मात्र ग्रामरचनेचे, गावउभारणीचे रचनात्मक व दीर्घकालिन अशा प्रक्रियेत गुंतायचे होते हे स्पष्ट होते, त्यामुळे मी त्याकडे फार लक्ष दिले नाही. एम.ए.चे दुसरे वर्ष संपत आले. परीक्षा झाल्या, तरीही योग्य दिशा सापडली नाही. परीक्षा देऊन घरी आले. मात्र दोन वर्षे पुण्यात राहूनही आपणास दिशा मिळाली नाही याचे दु:ख होते. मनात तळमळ खूप होती. कधी कधी एकांतात ओक्साबोक्शी रडायचेही. आपणास नेमके काय करायचे आहे हे कुणास सांगताही येईना. मात्र गावातील लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी सोयी उपलब्ध व्हाव्यात हे स्पष्ट होते. मात्र ते कसे करणार, त्यासाठी काय करणार हे त्या वेळी कळत नव्हते, सुचत नव्हते.
मी परत पुण्यात आले. गेल्या दोन वर्षांत मी अनेकांना सांगून ठेवले होते की, जर तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करणाºया संस्थांची माहिती मिळाली तर मला नक्की सांगा आणि त्याचा परिणाम म्हणूनच स्पर्धा परीक्षा देणाºया सटाण्याचा एक मित्रांचा ग्रुप होता. त्यांनी डॉ.एस.एस. कलबाग व त्यांच्या विज्ञानआश्रमच्या कार्याची माहिती दिली. १९ जुलै १९९५ रोजी डॉ.कलबाग यांना भेटण्यास गेले. त्यांचे काम बघितले. ते बघताना, त्यांच्याशी बोलताना वाटले की, हो मला माझा मार्ग सापडला व कलबाग सरांसोबत पुढील वाटचाल सुरू झाली.
रेमन मॅगसेसे पुरस्कारातून गावचे नाव सातासमुद्रापार नेणाºया नीलिमा मिश्रा शब्दाने सर्वांना आपलेसे करणाºया गोड स्वभाव शैलीमुळे बहादरपूरसारख्या छोट्या गावातून नीलिमा मिश्रा या ‘गोधडी’वाल्या ‘दीदी’ पुढे आल्या.
भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान मंच या संस्थेच्या माध्यमातून चार जिल्हात दोन हजार गावात चारशेहून अधिक बचत गट स्थापन करून महिलांना एकत्रित करून त्यांना स्वत:च्या पायावर स्वयंरोजगार नीलिमा मिश्रा यांनी उपलब्ध करून दिला. महिलांनी तयार केलेल्या गोधडीला विदेशात मागणी आहे तर महिलांकडून तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू स्वत:चा गोड स्वभावातून त्याची विक्री करतात. गोड बोलण्याने विश्वास निर्माण झाला पाहिजे. गोड बोलण्याच्या संवादातून बचत गटात उद्योगात त्याचा फायदा झाला. संवादामुळे महिलामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि महिलांची मार्केटिंग यातून झाली.
नीलिमा मिश्रा यांनी पारोळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकºयांना कर्ज न देता अनुदान देण्याचा निर्णय घेतला पण त्याला आदर्श निकष घालून दिले शेतकºयांच्या पत्नीचे हिमोग्लोबिनचे प्रमाण नऊच्या वर असले पाहिजे. छताचे पाणी शोषखड्ड्यात जिरविले पाहिजे. निसर्ग उपचार घेतला पाहिजे. रोज प्राणायाम केले पाहिजे. यात शेतकरी तंदुरुस्त तर देश तंदुरुस्त असे त्या म्हटल्या.
बहादरपूर गावात अनेक योजनेच्या माध्यमातून गावाचा कायापालट त्यांनी केला. ग्रामीण भागात महिला उघड्यावर शौचास बसत. त्यावर उपाय म्हणून बंदिस्त गप्पा शौचालय त्यांनी उभारले.

Web Title: Ramon Magsaysay Award Nilima Mishra - A Childhood Reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.