पारोळा तालुक्यातील २१ गावांना तीव्र पाणीटंचाईचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 07:57 PM2018-02-12T19:57:01+5:302018-02-12T20:03:36+5:30
पारोळा तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी खालावल्याने तसेच प्रकल्पांमधील जलसाठा कमी झाल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून यातील २१ गावांना तीव्र चटके बसत आहेत. यातील ८ गावांना टँकरने पाणी पुरवठा होत असून ९ गावांना विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
आॅनलाईन लोकमत
पारोळा, दि.१२ : तालुक्यात एकूण २१ गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. यातील ८ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून ९ गावांना विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्यातील आणखी ३ गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली असून १ गावाला विहीर अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे.
या वर्षी पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणच्या प्रकल्पांसह विहीरींची पाणी पातळी कमी झाली आहे. या मुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे
सद्यस्थितीत तालुक्यातील रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री, मोहाडी, दहीगाव, पोपटनगर, मंगरुळ, खेडीढोक, हिवरखेडे, कंकराज, वडगाव प्र अ , या ८ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर सारवे, (रामनगर) शेळावे बुद्रूक राजवड, अंंबापिंप्री, जिराळी, महालपूर, पळासखेडे बुद्रूक , कराडी, भिलाली, नेरपाट, या गावांना विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर वाघरा, वाघरी, बाभळेनाग या गावांना तीन टँकरची मागणी आहे. दरम्यान, लोणी सिम या गावातील पाणी टंचाई पाहता तेथे विहीर अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे ग्रामपंचायतकडून प्राप्त झाला आहे. हे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदार यांच्याकडे पाठविले जाणार असल्याचे गटविकास अधिकारी आर.के. गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या वर्षी तालुक्यातील भोकरबारी, म्हसवे, इंदासी या प्रमुख धरणांनी तळ गाठला असून यामुळे पाण्याचे टँकर भरण्याची पंचाईत झाली आहे.