रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानीचा अहवाल शासनाला सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:15 AM2021-05-30T04:15:24+5:302021-05-30T04:15:24+5:30
जळगाव : रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात २७ मे रोजी अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाच्या ...
जळगाव : रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात २७ मे रोजी अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाला कळविले आहे. दरम्यान, या दोन्ही तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे एक-दोन दिवसांत पूर्ण होणार असून, त्यानंतरच एकूण नुकसानीचा आकडा समोर येणार आहे, असे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
गुरुवार, २७ मे रोजी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पाऊस व चक्रीवादळ होऊन २०४२.६० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले. यामध्ये रावेर तालुक्यात ७५७.६०, तर मुक्ताईनगर तालुक्यात १२८५ हेक्टरवरील केळी जमीनदोस्त झाली. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. त्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविला आहे.
या दोन्ही तालुक्यांत पंचनामे करण्यात येत असून, सविस्तर पंचनामे समोर आल्यानंतरच नुकसानीचा एकूण आकडा स्पष्ट होणार आहे. एक-दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला.