रावेर तालुक्याला वादळाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:54+5:302021-06-03T04:12:54+5:30
रावेर, जि. जळगाव : रावेर तालुक्यातील केऱ्हाळा या गावासह परिसराला बुधवारी पहाटे वादळी पावसाने झोडपून काढले. यामुळे ...
रावेर, जि. जळगाव : रावेर तालुक्यातील केऱ्हाळा या गावासह परिसराला बुधवारी पहाटे वादळी पावसाने झोडपून काढले. यामुळे शेकडो एकरांतील केळी भुईसपाट झाली. यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्री दीड-दोन वाजेनंतर अचानक जोरदार पाऊस सुरू झाला, तो पहाटे अडीच-पावणेतीनपर्यंत सुरू होता. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने क्षणात रौद्ररूप धारण केले. वादळाच्या तडाख्यात होत्याचे नव्हते झाले. यात शेकडो एकरांतील कापणीस पक्व असलेली केळी भुईसपाट झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
शेती शिवारासह गावातील मोठमोठी झाडे उन्मळून पडली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे पडल्यामुळे सकाळच्या सुमारास काहीकाळ रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. गावातील अनेक ठिकाणी घरावरील पत्रे लांब अंतरावर उडत गेले. काही घरांची पडझड झाली आहे. हातातील हंगाम गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एकतर आजच येणारा पैसा हातातून गेला व दुसरीकडे नवीन हंगाम उभा करण्याचे संकट उभे राहिले आहे.