व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देत संकटातून सावरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 08:24 PM2020-11-02T20:24:21+5:302020-11-02T20:24:42+5:30
टेण्ट असोसिएशनची मागणी : काळ्या फिती लावून धरणे आंदोलन
जळगाव : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनामुळे ठप्प असलेला टेण्ट, मंडप, केटरींग व संबंधित व्यवसाय बंद असल्याने या व्यावसायिकांवर उपासमार व आत्महत्या करण्याची वेळ आली असून यातून सावरण्यासाठी हे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी जळगाव टेण्ट ॲण्ड डेकोरेशन असोसिएशनतर्फे करण्यात आली. या विषयी संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हापासून सर्व व्यवहार ठप्प झाले. मात्र इतर व्यवहारांना परवानगी देण्यात आली. मात्र अजूनही वरील व्यवसाय सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
यात म्हटले आहे की, टेण्ट, मंडप, केटरींग, मंगल कार्यालय, डि.जे. साऊंड, लाईट, टेकोरेशन इत्यादी व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे व्यावसायिक तणावाखाली येऊन आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे यातून सावरण्यासाठी सर्व प्रकारच्या सामाजािक कार्यक्रमांमध्ये क्षमतेच्या निम्मे आसनक्षमतेच परवानगी अथवा ५०० जणांच्या उस्थितीत कार्यक्रमांची परवानगी मिळावी. या व्यवसायांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर करण्यात यावी, भाडे माफ करावे, कर्जदारांचे व्याज माफ करावे, उद्योगाचा दर्जा मिळावा, या व्यवसायांच्या कर्जावर सबसिडी मिळावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध संघटनांनी यास पाठिंबा दिला तसेच व्यावसायिकांनी काळ्या फिती व काळे कापड गळ्यात घालून आंदोलन केले.
या वेळी खासदार रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे पालकमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.
निवेदनावर अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष प्रितेश चोरडिया, सचिव सुनील लुल्ला, कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, राजेश नाईक, संतोष दप्तरी, किशोर पाटील यांच्या सह्या आहेत.