मनपाकडून दुसऱ्यांदा पाठविण्यात आली नोटीस : जैविक कचरा संकलन फसवणूक प्रकरण; महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडूनही मागितला खुलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याच्या संकलनात गैरव्यवहार केल्याच्या तक्रारीवरून मनपाने संबंधित मन्साई कंपनीला मनपाने सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पंधरा दिवस होऊनदेखील संबंधित कंपनीने मनपाकडे खुलासा दिला नसून, कंपनीकडून खुलासा सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. खुलासा मिळत नसल्याने त्याचा परिणाम चौकशीवर होत असल्याची माहिती सहायक आयुक्त पवन पाटील यांनी दिली आहे.
शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधून जैविक कचरा संकलनाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून शहरातील मन्साई बायोमेडिकल वेस्ट ही कंपनी करीत आहे. मात्र, या कंपनीकडून जैविक कचरा संकलनामध्ये मनपाने घालून दिलेल्या अटी शर्तींचा भंग करून, महापालिकेची फसवणूक केल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार मनपा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत ही तक्रार योग्य असल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने मन्साई बायोमेडिकल वेस्ट कंपनीला २१ मे रोजी नोटीस बजावून मनपाकडे अनेक महिन्यांपासून रॉयल्टी जमा केली नाही याबाबतचा खुलासा सादर करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले होते. मात्र, संबंधित कंपनीने याबाबत कोणताही खुलासा मनपाकडे सादर केलेला नाही. २८ मे रोजी संबंधित कंपनीने मनपाला पत्र पाठवून खुलासा सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, मनपाने ही मुदत नाकारत, आता ४ जूनपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश मनपाने दिले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडूनही उत्तर नाही
मन्साई बायोमेडिकल वेस्ट कंपनीला २० वर्षांसाठी जैविक कचरा संकलन करण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. जैविक कचरा व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने संबंधित कंपनीला जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ठेकेदाराने रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत २० टक्के रॉयल्टीची रक्कम मनपाला द्यावी लागते. मात्र, संबंधित ठेकेदाराने चोपडा व भुसावळ तालुक्यातील रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या जैविक कचराबाबत व या रुग्णालयाची माहितीदेखील महापालिकेला दिली नाही. त्यामुळेच मनपाने या कंपनीला खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे या कंपनीने किती रुग्णालयांची नोंद केली आहे. याबाबतदेखील मनपा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाकडे माहिती मागविली होती. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळानेदेखील मनपाला याबाबतची अद्यापही माहिती दिली नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कचऱ्यातून कमाई सुरूच?
शहरातील दैनंदिन साफसफाईच्या मुद्द्यावरून वॉटर ग्रेस कंपनीबाबत तक्रारी कायम असताना, आता जैविक कचरा संकलनाबाबतदेखील तक्रारी वाढल्यामुळे कचऱ्यातून पैसे कमाविण्याचा नवीन फंडा सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मनपा प्रशासनाकडून याबाबत चौकशी सुरू केली असली, तरी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाही संबंधित कंपनीवर झालेली नाही. तसेच खुलासा सादर करण्यात टाळाटाळ होत असल्याने हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.