जळगाव येथील डॉ.सी.जी.चौधरी यांच्या दवाखान्यात भराडीच्या तरुणीच्या मृत्यूमुळे नातेवाईकांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 07:17 PM2017-10-19T19:17:28+5:302017-10-19T19:19:34+5:30
पोटदुखीच्या त्रासामुळे डॉ.सी.जी.चौधरी यांच्या दवाखान्यात दाखल केलेल्या दीपाली नाना पाटील (वय १८ रा.भराडी, ता.जामनेर ह.मु.सुरत) या तरुणीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. रुग्णाचे हाल होत असताना डॉक्टर दोन तास पुजेत गुंतले व त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी दवाखान्यात गोंधळ घातला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरही चार तास गोंधळ सुरुच होता.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१९ : पोटदुखीच्या त्रासामुळे डॉ.सी.जी.चौधरी यांच्या दवाखान्यात दाखल केलेल्या दीपाली नाना पाटील (वय १८ रा.भराडी, ता.जामनेर ह.मु.सुरत) या तरुणीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. रुग्णाचे हाल होत असताना डॉक्टर दोन तास पुजेत गुंतले व त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी दवाखान्यात गोंधळ घातला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरही चार तास गोंधळ सुरुच होता.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील भराडी येथील दीपाली नाना पाटील या तरुणीला गुरुवारी मध्यरात्री पोटदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागल्याने तिला पहाटे पाच वाजता दक्षता नगर पोलीस लाईनसमोरील डॉ.सी.जी.चौधरी यांच्या नित्यसेवा नर्सिंग होम या दवाखान्यात दाखल करण्यात आले. आठ वाजेपर्यंत डॉक्टरांनी तिच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. नंतर रक्त, लघवी तपासणी करुन सोनोग्राफीसाठी रुग्णाला बाहेर पाठविण्यात आले. त्यानंतर डॉक्टर पूजेसाठी गेले, त्याच वेळी रुग्णाला जास्त वेदना होऊ लागल्या. वारंवार डॉक्टरांना बोलावले असता ते पूजेत असल्याचे सांगण्यात येत होते. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने दुपारी दोन वाजता तरुणीचा मृत्यू झाला.
अन् डॉक्टरांवर संताप वाढला
सोनाग्राफी व रक्ताच्या चाचण्यांसाठी तरुणी स्वत: चालत बाहेर गेलेली असताना अचानक प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त करुन डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला.प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून डॉ.सी.जी.चौधरी यांनी जिल्हा पेठ पोलिसांना तसेच अन्य डॉक्टरांना दवाखान्यात बोलावून घेतले. तर नातेवाईकांनीही जि.प.चे माजी सदस्य समाधान पाटील व अन्य नातेवाईकांनी बोलावून घेतले. नातेवाईक व डॉक्टर यांच्यात जोरदार वाद झाला. वाद वाढत असल्याने पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनीही घटनास्थळ गाठले. डॉक्टर व नातेवाईक यांचे म्हणणे समजूत घेत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
शवविच्छेदन करण्यावरुनही वाद
मयत तरुणीचे आई, वडील सुरत येथे राहत असल्याने डॉक्टरांवरील आरोप मागे घेत शवविच्छेदन करण्यास नकार दिला. मात्र पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असल्याने मृत्यूचे कारण कळण्यासाठी शवविच्छेदन करणे गरजेच आहे.डॉ.चौधरी यांनी मृत्यूचे कारण लिहून दिले तरच विना शवविच्छेदन करता मृतदेह नेता येईल, असे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी स्पष्ट केले, मात्र डॉ.चौधरी यांनी मृत्यूचे कारण देण्यास नकार दिला. त्यामुळे शवविच्छेदन करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे गायकवाड यांनी समजावून सांगितले.