ऑनलाइन पद्धतीने प्रभू येशूंचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:13 AM2021-04-03T04:13:18+5:302021-04-03T04:13:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही ‘गुड फ्रायडे’ उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने, शहरातील ख्रिश्चन बांधवांनी ऑनलाइनद्वारे साध्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही ‘गुड फ्रायडे’ उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने, शहरातील ख्रिश्चन बांधवांनी ऑनलाइनद्वारे साध्या पद्धतीने गुड फ्रायडेनिमित्त प्रभू येशूंचे स्मरण केले. शहरातील अलायन्स चर्च, फ्रान्सिस डिफेल्स चर्च व थॉमस चर्मध्ये धर्मगुरूंनी प्रभू येशूंच्या जीवन कार्याची माहिती देऊन येशूंसारखे पवित्र जीवन जगणे व इतरांना मदत करण्याचा संदेश दिला.
ख्रिश्चन बांधवांतर्फे दरवर्षी गुड फ्रायडे हा इस्टर संडेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. हा दिवस प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच या दिवशी चर्चमध्ये धार्मिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात येते. मात्र,यंदाही कोरोनामुळे शहरातील ख्रिश्चन बांधवांतर्फे गुड फ्रायडेचे सर्व सामूहिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. कोरोनामुळे शहरातील तिन्ही चर्चमध्ये धर्मगुरूंनी ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासून प्रभू येशूंची प्रार्थना व स्मरण ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
दरम्यान, यावेळी झालेल्या ऑनलाइन प्रवचनात अलायन्स चर्चचे धर्मगुरू शशिकांत वळवी यांनी प्रभू येशू ख्रिस्त यांच्या वधस्तंभावरील सात उद्गारांवर पवित्र बायबलमधील वचनांच्या आधारे निरूपण केले.
इन्फो :
कोरोनामुळे पहिल्यांदाच ऑनलाइन प्रार्थना
दरवर्षी या दिवशी शहरातील ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने प्रभू येशूंचे नामस्मरण करून हा दिवस साजरा करतात. प्रार्थनेनंतर एकमेकांना निरामय आरोग्याच्या शुभेच्छा देतात, आपली सुख-दुःखे सांगतात. मात्र, यंदाही कोरोनामुळे समाज बांधवांना एकत्र येता आले नाही. कोरोनामुळे गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच गुड फ्रायडे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आल्याचे शशिकांत वळवी यांनी सांगितले.