नूतनीकरणासाठी गाळेधारकांनाच सिद्ध करावी लागेल पात्रता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:09+5:302021-05-14T04:16:09+5:30
मनपा प्रशासनाकडून घेतली जाईल सुनावणी : दोन महिन्यांच्या काळात प्रक्रिया होणार पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत ...
मनपा प्रशासनाकडून घेतली जाईल सुनावणी : दोन महिन्यांच्या काळात प्रक्रिया होणार पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत बुधवारी झालेल्या महासभेत मनपा प्रशासनाने सादर केलेल्या धोरणाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळ्यांचा नूतनीकरण व लिलावाचा मार्ग मोकळा झाला असून, नूतनीकरणासाठी गाळेधारक पात्र आहेत की नाही, याबाबतची पात्रता आता गाळेधारकांना मनपाकडे सिद्ध करावी लागणार आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून शहरातील २३ मार्केटमधील सुमारे २७०० गाळेधारकांच्या गाळ्यांची मुदत संपली होती. मात्र, याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. तसेच न्यायालयाने निर्णय देऊनही केवळ राजकीय फायद्यासाठी याप्रकरणी कोणतीही कार्यवाही होऊ शकली नव्हती. मात्र, मनपा प्रशासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन तोडगा काढण्यासाठी महासभेपुढे प्रस्ताव ठेवला होता. तसेच या प्रस्तावाला महासभेची मान्यता मिळाल्यामुळे आता मनपा प्रशासनाला थकीत भाडे वसूल करून नूतनीकरण की लिलाव याबाबतचा निर्णय घेता येणार आहे.
पंधरा दिवसांत राबवण्यात येणार सुनावणी प्रक्रिया
गाळेधारकांना नूतनीकरण करण्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर केली जाणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये राज्य शासनाने ७९ क या कलमामध्ये केलेल्या बदलानुसार गाळेधारक नूतनीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. या संदर्भातली नियमावली गाळेधारकांना दिल्यानंतर गाळेधारक या नियमावलीच्या पात्रतेत बसत आहेत की नाही, याबाबतचे पुरावे महापालिका प्रशासनाकडे सादर करावे लागणार आहेत. जे गाळेधारक या नियमावलीत बसतील. त्यांनाच नूतनीकरणाचा लाभ मिळू शकणार आहे. याबाबतची प्रक्रिया पंधरा दिवसांत राबवली जाणार आहे.
पात्र न झाल्यास गाळ्यांचा होणार लिलाव
मनपाच्या नियमावलीत जे गाळेधारक पात्र ठरणार नाहीत, अशा गाळेधारकांच्या गाळ्यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच गाळेधारकांना पात्र ठरण्यासाठी ९ वर्षांची थकीत भाड्याची रक्कम मनपाकडे भरावीच लागणार आहे. थकीत भाड्याची रक्कम न भरल्यास गाळे लिलाव अटळ आहे. २७०० गाळेधारकांपैकी केवळ २६० गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम आतापर्यंत भरली आहे.