लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सेवानिवृत्त उपकुलसचिव व सध्या एमआयटी पुणे येथील परीक्षा नियंत्रक ज्ञानदेव बाजीराव निलवर्ण यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती न दिल्यामुळे त्यांना माहिती आयुक्तांनी दोन हजार पाचशे रुपयांचा दंड केलेला आहे.
विद्यापीठातील कर्मचारी संजय सपकाळे यांनी त्यांच्या कालबद्ध पदोन्नती बाबत नेमलेल्या डॉ. राजेंद्र कांकरिया समितीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे मागितला होता. पण विद्यापीठ प्रशासनाकडे सदर अहवाल असतांना नस्ती सापडत नाही असे उत्तर संजय सपकाळे यांना दिले जात होते. त्यामुळे सपकाळे यांनी विद्यापीठाचे तत्कालीन माहिती अधिकारी ज्ञानदेव निलवर्ण यांच्याकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. ती माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. नंतर तत्कालीन प्रथम अपील अधिकारी डॉ. अंबालाल चौधरी यांच्याकडे माहिती मागितली पण त्यांनीही माहिती देण्याबाबत आदेश दिले नाहीत. माहिती न मिळाल्यामुळे सपकाळे यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही. शेवटी त्यांनी माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडे द्वितीय अपील सादर केले. सुनावणीच्या वेळी ज्ञानदेव निलवर्ण यांनी मी आता सेवानिवृत्त आहे व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे असा लेखी युक्तिवाद केला तो माहिती आयोगाने अमान्य केला. तत्कालीन उपकुलसचिव तथा माहिती अधिकारी ज्ञानदेव बाजीराव निलवर्ण यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे दोन हजार पाचशे रुपयांची राज्य माहिती आयोग नाशिक यांनी शास्तीची कार्यवाही करण्याचे आदेश पारित केले आहे.