परतीच्या पावसाचा खरिपाला फटका
By ram.jadhav | Published: October 18, 2017 01:20 AM2017-10-18T01:20:39+5:302017-10-18T01:25:16+5:30
कापूस व ज्वारी, काळी पडणार : मात्र रब्बीच्या अपेक्षा वाढल्या
राम जाधव, आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि़ १८ - उशिरा आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यासह राज्यातील सर्वच भागात खरीप हंगामाचे नुकसान होत आहे़ मात्र काही भागात झालेल्या दमदार पावसाने रब्बी हंगामातील पिकांची अपेक्षा वाढत आहे़
यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने खरिपाच्या हंगामाची बोंबाबोंब आहे़ तर शेवटच्या टप्प्यात होणाºया पावसाने मात्र रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढण्याची शेतकºयांना अपेक्षा आहे़ अजून पाऊस झाल्यास गव्हाच्या लागवडीचे क्षेत्र वाढू शकते़ तर हरभरा, दादर, करडई व रब्बीचा मका या पिकांचीही लागवड वाढेल़
परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे जरी नुकसान होऊन जरी आपला बळी जात असला, तरी रब्बी हंगामातील पीक मिळण्याची शक्यता या ‘बळीराजा’ला आहे़ अजून काही भागात जोरदार पाऊस झाल्यास व धरण, प्रकल्प क्षेत्रात पाणी पातळी वाढल्यास रब्बी पिकांची लागवड वाढणार आहे़ यामध्ये गहू, मका, हरभरा, दादर, करडई यासह इतर भाजीपाला पिके वाढतील़ मात्र थोडेफारच पाणी राहिल्यास शेतकरी कमी कालावधीचे पीक म्हणून भाजीपाल्याला महत्त्व देतील़ खरीप हंगामाच्या संपूर्ण कालावधीत पावसाने उघडझापच केली़ त्याचा परिणाम खरिपाच्या उत्पादनावर झाला आहे़ त्यातच जे आले ते हातचे जात आहे़ अनेक शेतकºयांनी ज्वारी, मकाच्या पिकाची सोंगणी केलेली आहे, तर काहींची पिके अजून उभीच आहे़ आडवा पडलेला मका व चारा सडत आहे़ आता तर जमिनीवर पडलेल्या कणसांना पावसामुळे कोंब फुटण्याची भीती आहे़ तसेच कणसातील दाणे पाण्यामुळे काळे पडत आहेत़
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण परिसरात थोड्या अधिक प्रमाणात लागवड केलेल्या ज्वारीची डोलदार कणसे दिसत होती़ मात्र आता अचानक आलेल्या परतीच्या पावसाने ज्वारीच्या कणसांना पाणी लागल्यामुळे ज्वारीचे दाणे काळे पडत आहेत़ त्यामुळे हातातोंडाशी आलेला ज्वारीचा पांढरा शुभ्र दाणा काळा पडून निकृष्ट झाला आहे़
या पावसामुळे जिल्ह्यातील ५० हजार हेक्टर भागात हाती आलेलं शेतकºयाचं पांढर सोनं म्हणजे कापूस पिवळा पडत आहे़ या कापसाला पाणी लागल्यास व्यापारी या मालाची कमी दरात खरेदी करत आहेत़ पाणी लागलेला माल म्हणून पड्या भावात खरेदी केल्याने उत्पादन खर्चाइतकाही भाव शेतकºयांना मिळत नाही़ आता या खराब झालेल्या मालाचा दर संपूर्णपणे व्यापाºयाच्या मनमानीपणाने ठरणार आहेत़ मात्र याच व्यापाºयांनी हा कापूस खरेदी करून गाडी भरताना शेकडो लीटर पाणी फवारले, तरी ते चालते़ सर्रासपणे हा प्रकार सगळीकडे चालतो़ मात्र याबद्दल कुठेही काहीच वाच्यता होत नाही़ यावर्षी मोठ्या आशेने केलेला खर्च निघेल, अशी शेतकºयांना अपेक्षा असताना ऐनवेळी पाऊस आल्याने शेतकºयांच्या या स्वप्नांवर मात्र नक्कीच पाणी फिरले आहे़
आठवडाभरापासून ज्वारी शेतात पडून आहे़ पाऊस पडत असल्याने ज्वारी काळी पडत आहे़ अजून पाऊस पडल्यास या ज्वारीला कोंब येतील़ कापूस पावसात भिजला आहे़ निसर्गानेही मारले आहे, त्यामुळे तारण्यासाठी कोणाकडे हाक मारणार?
- धनजी धांडे, शेतकरी, खानापूर, ता़ रावेऱ